शाळा बंद करण्याच्या भिवंडी पालिकेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयात आंदोलन
By नितीन पंडित | Published: October 9, 2023 07:10 PM2023-10-09T19:10:01+5:302023-10-09T19:11:32+5:30
आसबीबी येथे पालिकेची शाळा क्रमांक ६५ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मध्ये एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील आसबिबी परिसरात असलेली महानगरपालिका शाळा क्रमांक ६५ ची शाळा इमारत सुविधा नसल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.त्याविरोधात सोमवारी पालकांनी आपल्या पाल्यांसह पालिका मुख्यालय गाठत मुख्यालयात आंदोलन केले. त्यानंतर पालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत शाळा त्याच ठिकाणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले.
आसबीबी येथे पालिकेची शाळा क्रमांक ६५ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मध्ये एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व शौचालय सुविधा नसल्याने अनेकांनी तक्रारी केल्याने याची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो दाखल केली होती.त्यावर पालिका प्रशासनाने म्हणणे न मांडल्याने राज्य मानवी हक्क आयोगाने ही शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर तत्कालीन आयुक्त यांनी तात्पुरत्या स्वरूपात फिरते शौचालय व्यवस्था केल्याने शाळा सुरू होती.परंतु पालिका प्रशासनाने पुन्हा नव्याने शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करीत येथील विद्यार्थ्यांचे स्थलांतर एक किलोमीटर अंतरावरील रावजी नगर येथील शाळा क्रमांक ७३ या ठिकाणी केले.
लहान मुले रस्ता ओलांडून जाताना अपघाता घडण्याची शक्यता असल्याने या निर्णयास शाळेतील विद्यार्थी व पालक यांनी विरोध दर्शवला असून त्यांनी थेट पालिका मुख्यालय गाठून तेथे आंदोलन केले .त्यानंतर पालिका प्रशासनाने आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.