भाजपपाठोपाठ काँग्रेसही कांदे घेऊन मैदानात; राजकीय वादाचा ठाणेकरांना फायदा
By अजित मांडके | Published: December 4, 2023 04:15 PM2023-12-04T16:15:55+5:302023-12-04T16:16:08+5:30
सध्या बाजारपेठेत कांद्याचा भाव ६० ते ७० रुपये एवढा झाला आहे
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काही दिवसांपूर्वी ठाण्यात भाजपच्या वतीने स्वस्त दरात कांदे वाटप करण्यात आल्यानंतर त्यानंतर आता ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने देखील ठाणेकरांसाठी स्वस्त दरात कांदे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. कांद्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु झाली असली तरी त्याचा फायदा मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना झाल्याचे दिसून आले आहे.
सध्या बाजारपेठेत कांद्याचा भाव ६० ते ७० रुपये एवढा झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याचेही भांडवल करीत सध्या ठाण्यात राजकीय स्पर्धा रंगली आहे. आधी ठाण्यात भाजपच्या वतीने स्वस्त दरात कांदे विक्री करण्यात आली होती. यावेळी त्यांनी २५ रुपये दराने कांद्याची विक्री केली होती. शहराच्या विविध भागात भाजपने स्टॉल उभारले होते. त्यानंतर या स्पर्धेत आता ठाणे शहर कॉंग्रेसही उतरली आहे. त्यांनी देखील आता ठाणेकरांना स्वस्त दरात कांदे देऊ केले आहेत.
ठाणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या वतीने व ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २५ रूपये कीलो प्रमाणे प्रत्येकी ४ कीलो कांदे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण याच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला खूप मोठी गर्दी नागरिकांनी केली होती, परंतु काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रत्येकी चार कीलो कांदे वितरण केले. आयोजक व शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सागितले की,सध्या वाढती महागाई पाहता नागरिक वाढत्या कांद्याच्या दराने त्रासली आहे अशा प्रसंगी काँग्रेसच्या वतीने शहरात स्वस्त दरात कांदे नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे एकीकडे राज्यातील भाजप आघाडी सरकारमुळे दिवसे दिवस महागाई वाढतच चालली आहे अशा प्रसंगी ठाण्यातील नागरिकांना एक दिलासा म्हणून अशा उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २२ खारकर आळी महागिरी,खारटन रोड व टेम्भी नाका परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला लवकर ठाण्यातील विविध भागात काँग्रेसच्या वतीने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली.