आयुक्तांच्या दिलगिरीनंतर ठाणे महापालिकेतील वाद शमला; उद्धव ठाकरेंकडे झाली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:46 PM2019-09-10T23:46:35+5:302019-09-10T23:46:54+5:30
अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याचे पत्र घेणार मागे; अधिक ताणून न धरण्याचे आदेश, कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी घेतली होती भेट
ठाणे : ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेसह अन्य पक्षाचे नगरसेवक व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात गेले दोन आठवडे रंगलेला वाद मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता शमला आहे. जयस्वाल यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. आपल्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव तातडीने चर्चेला घेण्याची मागणी करणारे जे पत्र जयस्वाल यांनी दिले होते ते मागे घेण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.
ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करुन तेथे ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याकरिता राज्य सरकारने ३१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण उद्या, बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याकरिता चार दिवसांपूर्वी जयस्वाल यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उभयतांमध्ये महापालिकेतील वादंगाबाबत चर्चा झाली होती. नगरसेवक व आयुक्त वाद चिघळला असतानाच कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिलो तर मीडिया याच विषयावरुन प्रश्नांची सरबत्ती करण्याची शक्यता ठाकरे यांना वाटत होती. शिवाय या कार्यक्रमात वादाचे पडसाद उमटले तर नामुश्की होईल, अशी भीतीही त्यांना वाटत होती. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश मस्के आदींसोबत आयुक्त जयस्वाल यांना ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर बोलावून घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त जयस्वाल यांनी आपण महापौर शिंदे यांना अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याबाबत दिलेल्या पत्रात एकाही शिवसेना नगरसेवकाचा उल्लेख केला नसल्याकडे लक्ष वेधले. आपण पत्रात काँग्रेस, भाजप नगरसेवकांचा उल्लेख केला असून सत्ताधारी शिवसेनेला सहकार्य करण्याचीच भूमिका सातत्याने घेतली आहे.
वेळप्रसंगी राज्यातील सत्ताधारी भाजपचा रोष पत्करला आहे. मात्र असे असतानाही विनाकारण आपल्याला शिवसेनेच्या काही नगरसेवकांकडून लक्ष्य केले जाते, अशी भूमिका जयस्वाल यांनी घेतली. मात्र महापौर शिंदे यांनी आपण सुरु केलेल्या कामांचे प्रस्ताव आयुक्तांनी हेतूत: कसे रोखून धरले, महासभेला अनुपस्थित राहण्याचे मेसेज कसे अधिकाऱ्यांना दिले गेले वगैरे बाबींकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले. आयुक्त हे महापौर, नगरसेवक यांचा अपमान करतात, याकडे महापौरांनी लक्ष वेधले. त्यामुळे जयस्वाल यांनी आपल्याकडून काही चुका झाल्याचे कबुल करीत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे यांनीही अधिक ताणून न धरण्याचे आदेश महापौरांना दिले.
मातोश्री भेटीनंतर वर्षावर पायधूळ
मातोश्रीवर आयुक्त जयस्वाल व शिवसेना नेतृत्व यांच्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्षा निवासस्थान गाठले असे समजते. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती जयस्वाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्याचे बोलले जाते. अर्थात याला दुजोरा मिळू शकला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राज्याच्या मुख्य सचिवांपासून अनेक बडे सनदी अधिकारी मातोश्रीवर पायधूळ झाडत होते. मात्र ठाण्यात सेनेची स्वबळावरील सत्ता असल्याने जयस्वाल यांनाही मातोश्रीवर पायधूळ झाडावी लागली, याची ठाण्यातील वर्तुळात चर्चा आहे.
ठाणे आयुक्त चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटले होते. वाद वाढू नये ही विनंती आयुक्तांनी केली होती. त्यामुळे ठाकरे यांनी सर्वांना बोलावले होते. समोरासमोर बसवून गैरसमज दूर केले. अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याचे पत्र मागे घेण्यास आयुक्तांना सांगितले. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र सभागृहात आयुक्तांची उपस्थिती असावी याबाबतचे आहे. शहराचा विकास डोळ््यासमोर ठेवून एकत्र काम करण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या आहेत. -एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे
आमच्याकडून कोणताच वाद नव्हता. आयुक्तांनी सुरुवात केली होती. मातोश्रीवर येऊन जयस्वाल यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र परत घेणार नाही. कारण वाद आयुक्तांनी सुरु केला होता. आयुक्त महासभेला वारंवार गैरहजर रहात होते. त्यामुळे आम्ही त्या पत्रात आयुक्तांनी महासभेला हजर रहावे, अशी सूचना केली आहे. कितीही वाद असले तरी ठाणे शहराच्या विकासासाठी एकत्र कामाला लागलो आहोत. वैयक्तिक वादाचा ठाण्याच्या विकासावर परिणाम होऊ नये या मताचे आम्ही आहोत.
- मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे