काम पूर्ण होऊनही पाण्याअभावी योजना रखडली

By admin | Published: March 22, 2016 02:04 AM2016-03-22T02:04:37+5:302016-03-22T02:04:37+5:30

६९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे २००८ साली मोठा गाजावाजा करून अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सध्या योजनेची बहुतांश कामे मार्गी लागली असली

After completing the work, the scheme failed due to lack of water | काम पूर्ण होऊनही पाण्याअभावी योजना रखडली

काम पूर्ण होऊनही पाण्याअभावी योजना रखडली

Next

शशी करपे,  वसई
६९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे २००८ साली मोठा गाजावाजा करून अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सध्या योजनेची बहुतांश कामे मार्गी लागली असली तर जोपर्यंत सूर्या टप्पा क्रमांक ३ च्या १०० एमएलडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत ६९ गावांना पाणी पुरवठा करता येणार नाही, असे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा पूर्व पट्टीतील ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळ जाणवू लागली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर दिलासा मिळणार असून त्यासाठी अजून काही महिने वाट पहावी लागणार आहे.
तत्कालीन विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर आणि वसई या चार नगरपालिकांच्या लगत असलेल्या ६९ गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ८५ कोटी रुपये खर्चाची ६९ गाव पाणी पुरवठा योजना साकारली. चारही नगरपालिकांनी त्यांना मिळणाऱ्या पाण्यातील १७ एमएलडी पाणी ग्रामीण भागाला देण्याचे मान्य केले. सूर्या, उसगाव आणि पेल्हारमधून हे पाणी देण्याचे त्यावेळी ठरले होते. या योजनेसाठी ८५ कोटी खर्च अपेक्षित धरून लोकवर्गणीतून १० टक्के आणि उर्वरित ९० टक्के सरकारी अनुदानातून केला जाणार होता. त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकवर्गणीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर टाकून लोकवर्गणीतून लोकांची सुटका केली.
सूर्या योजनेतून काशिदकोपर, कण्हेर, कोशिंंबे, टोकारे, दहीसर, कसराळी, खानिवडे, उमेळे, वडवली, किरवली. चोबारे, मुळगाव, खोचिवडे, नायगाव, पाली, चंदनसार, शिरगाव, गासकोपरी, सकवार या १९ गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पेल्हार धरणातून पेल्हार, सातीवली, चिंंचोटी, कोल्ही, कामण, मोरी, पोमण, शिलोत्तर, नागले, देवदळ, बापाणे, सारजा, ससुनवघर, धानीव, बिलालपाडा, राजीवली, जुचंद्र, चंद्रपाडा, वालीव, गोखीवरे या २० गावांना पाणी दिले जाणार आहे. उसगाव धरणातून मांडवी, चांदीप, उसगाव, शिवणसई, शिरसाड, खैरपाडा, चिखलडोंगरी, बोळींज, कोफराड, आगाशी, अर्नाळा, उमराळे, वटार, सत्पाळे, राजोडी, नाळे, वाघोली, मर्देस, नवाळे, निर्मळ, गास , कराडी, सांडोर, कौलार (खु), कौलार (बु.), वासळई, गिरीज, भुईगाव (खु.), भुईगाव (ब्रु.) आणि सालोली या तीस गावांना पाणी दिले जाणार आहे. यातील ५२ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे.
या योजनेतील बहुतांश कामे पूर्ण झालेली आहेत. जुचंद्र-बापाणे रस्ता रुंदीकरणामुळे चार किलोमीटरची पाईपलाईन स्थलांतरीत करावी लागणार आहे. हे काम जुलै अखेरीस पूर्ण होणार आहे. मात्र, या योजनेतून पाणी पुरवठा सूर्या टप्पा क्रमांक ३ ची योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुुुुरु होणार आहे. पालिका हद्दीत आधीच ९२ एमएलडी पाणी तुटवडा आहे. वाढीव १०० एमएलडी पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे महानगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लेखी कळवले आहे.

Web Title: After completing the work, the scheme failed due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.