महापौर चषकाच्या समारोपा नंतर मैदानात दारुची पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:37 PM2019-01-14T22:37:30+5:302019-01-14T22:37:53+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर चषकाच्या समारोपा नंतर सुभाषचंद्र बोस मैदानात झालेल्या दारु पार्टी वरुन पालिका व सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठु लागली आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर चषकाच्या समारोपा नंतर सुभाषचंद्र बोस मैदानात झालेल्या दारु पार्टी वरुन पालिका व सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठु लागली आहे. तर पार्टी नेमकी कोणी केली याचा तपा करण्यासाठी आयुक्तांनी पोलीसां कडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
एक कोटी रुपयांचा खर्च, राजकिय प्रसिध्दीसाठी मोठ्या प्रमाणात महापौरांची पालिकेच्या खर्चातुन बॅनरबाजी, शिवसेना - काँग्रेसने टाकलेला बहिष्कार, उद्घाटनाच्या कार्यक्रमास नागरीकांनी फिरवलेली पाठ , नियोजनाचा अभाव आदी अनेक कारणां मुळे महापौर चषक वादग्रस्त ठरला.
त्यातच समारोपा च्या रवीवारी झालेल्या कार्यक्रमात मध्यरात्री नंतर देखील ध्वनीक्षेपकाचा वापर करुन ध्वनी प्रदुषण कायद्याचे पालिकेनेच उल्लंघन केले. हे कमी म्हणुन की काय. सकाळी मैदानात आलेल्या खेळाडुंना पालिकेच्या व्यासपीठावर दारुची पार्टी झाल्याचे आढळुन आले.
मैदानात प्रवेश करताच पालिकेने बांधलेले बेकायदा पक्के व्यासपीठ असुन खोली तसेच स्वच्छतागृह आहे. त्याच स्टेज वर महापौर चषकाच्या फलका मागे कपड्याने बंदिस्त छोटी खोली तयार करण्यात आली होती. आत मध्ये महागड्या विदेशी ब्लॅक लेबल दारुची रीकामी बाटली, खोका तसेच बंदी असलेले प्लॅस्टीकचे ग्लास व कागदांचे ग्लास पडलेले होते. शिवाय पाण्याच्या रीकाम्या बाटल्या आणि जेवणाच्या पत्रावळ्या , उष्टं पडलेलं होतं. खुर्चीवर, खाली लादीवर आणि स्वच्छतागृहात ओकुन घाण करण्यात आली होती.
अत्यंत गलिच्छ स्थिती व पालिकेच्या स्टेजवर झालेली दारुची पार्टी पाहुन सकाळी खेळायला आलेल्या खेळाडुं मध्ये देखील चर्चेचा विषय बनला. पालिकेचे कंत्राटी सुरक्षा रक्षक तसेच आरोग्य व वन विभागाचे कर्मचारी देखील हे पाहुन अवाक झाले. परंतु वरिष्ठांना कळवण्यासह पोलीसांना पाचारण न करता काही वेळाने सर्व उचलुन सफाई करण्यात आली. या प्रकाराने महापौर चषकावर टिकेची झोड उठली आहे.
ध्रुवकिशोर पाटील ( नगरसेवक तथा सदस्य क्रिडा समिती ) - आम्ही रात्री साडेबारा वाजे पर्यंत मैदानात होतो. त्या नंतर काय झाले ते माहित नाही. कोणी नगरसेवक आदी असे करणार नाही. सुरक्षा रक्षक व संबंधित यांची जबाबदारी होती. सीसीटीव्ही तपासा. दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
बालाजी खतगावकर ( आयुक्त ) - या प्रकरणी पालिका भार्इंदर पोलीस ठाण्यात पत्र देऊन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करेल. मैदानां मध्ये असे प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाईल.
रौफ कुरेशी ( नागरीक ) - पालिकेचा नव्हे तर भाजपाने हायजॅक केलेला हा चषक होता. यात पार्टी करणारे नगरसेवक आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे. मैदानाची जबाबदारी ज्यांची आहे त्यांच्यावर सुध्दा कारवाई झाली पाहिजे.