मृत्यूनंतर उरले उपाययोजनांचे ‘सोहळे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:16 AM2018-11-03T00:16:39+5:302018-11-03T00:17:01+5:30

विहिरीची स्वच्छता सुरू; गाळ, पाण्याच्या नमुन्यांची तपासणी, एका कंपनीस ठोकले सील

After the death, the 'Remedies' program | मृत्यूनंतर उरले उपाययोजनांचे ‘सोहळे’

मृत्यूनंतर उरले उपाययोजनांचे ‘सोहळे’

- मुरलीधर भवार 

कल्याण : पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील एका विहिरीत विषारी वायूमुळे गुरुवारी पाच जणांचा बळी गेला. या विहिरीतील गाळ स्वच्छ करावा, अशी मागणी रहिवाशांनी महापालिकेकडे वारंवार केली होती. मात्र, त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. पाच जणांच्या मृत्यूनंतर महापालिकेने उपाययोजनेचे सोहळे सुरू केले आहेत. याच उपाययोजना वेळीच केल्या असत्या, तर पाच जणांचा जीव जाण्याची वेळ आलीच नसती, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

विहिरीतील गाळ साफ करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्याची प्रशासनाने दखल का घेतली नाही, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर शुक्रवारी महापालिकेच्या मैलासफाई करणाऱ्या पथकाने तेथे धाव घेतली. सकाळपासूनच सकर मशीनने विहिरीतील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. सकर मशीन चालवणाºयांनी सर्वप्रथम तिथे माचिसची काडी पेटवून विषारी वायूचा अंदाज घेतला. त्यानंतर, स्वच्छता सुरू केली. विहिरीतील गाळ साफ केल्यानंतर ती पाण्याने जवळपास ७५ टक्के भरली. विहिरीतील गाळ व पाण्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर नेमका कोणता वायू व रसायन होते, हे उघड होणार आहे.

विहिरीच्या मागच्या परिसरात तीन कारखाने आहे. त्यातून सोडण्यात येणारे सांडपाणी जमिनीत झिरपून ते विहिरीत मिसळले. त्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याविषयी वारंवार तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मृतांचे नातेवाइक व नागरिकांनी केला आहे. याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील म्हणाले की, ‘दोन वर्षांत एकही तक्रार त्यांच्याकडे आलेली नाही. विहिरीच्या परिसरातील तिन्ही कारखान्यांतील प्रक्रियेतून रासायनिक सांडपाणी तयार होत नाही. त्यापैकी एकात सल्फरवर प्रकिया केली जाते. त्यात पाण्याचा वापर होत नाही. फिनेलचे ट्रेडिंग करणारा दुसरा कारखाना आहे. तर, तिसरी आॅरगॅनिक कंपनी आहे. आॅरगॅनिक व सल्फरच्या कारखान्यांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आहे. फिनेल ट्रेडिंग करणाºया कारखान्यास महापालिकेने गुमास्ता परवाना दिला आहे. तेथे घरगुती सांडपाणी विहिरीच्या बाजूने वाहत आहे. हेच पाणी विहिरीत मिसळत असावे. घटनेनंतर तेथील पाण्याचे नमुने घेतले आहेत. तसेच पाण्याचा सामू (पीएच) तपासला असता तो सात असल्याचे आढळले आहे. पाण्यात अ‍ॅसिड व अल्कली नाही. विहिरीत गाळ आहे. त्यामुळे सल्फरडाय व मिथेन वायू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल चार दिवसांनी मिळेल, असे धनंजय पाटील यांनी सांगितले.

कारखान्यांची तपासणी तीन दिवसांत
कल्याण : चक्कीनाका परिसरातील रासायनिक कारखान्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांसमवेत तपासणी करून तीन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश पालिकेने आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना शुक्रवारी दिले. या कारखान्याचे रसायनमिश्रित सांडपाणी गटारातून जमिनीत आणि त्यावाटे विहिरीत झिरपत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप असून त्याची खातरजमा करण्यासाठीच कारखान्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक सुनील जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोग्य विभाग आणि ‘ड’ तसेच ‘जे’ प्रभाग अधिकारी कारखान्यांची तपासणी करणार आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत बळी गेलेल्या दोन्ही फायरमनला कर्तव्य बजावताना सुरक्षेची साधने देण्यात आलेली नव्हती, असा आरोप होत आहे. त्यांच्या मृत्यूला अधिकाºयांची निष्काळजी कारणीभूत असल्याचा आरोप अग्निशमन कर्मचाºयांच्या भारतीय कामगार सेनेने केला आहे. विहिरीत तिघांचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाला असताना, दोन्ही फायरमनला मास्क तसेच सेफ्टी बेल्ट लावून उतरण्यास का सांगितले नाही, असा सवालही केला आहे. याप्रकरणी अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी कामगार सेनेचे पदाधिकारी शरद कुवेसकर यांनी केली आहे. अधिकाºयांची हलगर्जी दोन्ही फायरमनच्या जीवावर बेतल्याचा आरोप काही अग्निशमन कर्मचाºयांनी केला आहे. आम्ही नागरिकांचे प्राण वाचवतो, परंतु, आमच्याच माणसांचे प्राण आम्ही वाचवू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रयोगशाळेवर कामाचा ताण
दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर हवेतील प्रदूषण मोजमापाचे काम प्रयोगशाळेकडे आहे. त्यामुळे प्रयोगशाळेवर अगोदरच कामाचा ताण आहे. परिणामी, या दुर्घटनेच्या चौकशीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल चार दिवसांत मिळणार की नाही, याविषयी साशंकता आहे. याशिवाय, दिवाळीची सुटीही आहे. त्यामुळे अहवाल मिळण्यास १५ दिवस लागू शकतात.

बळीच घ्यायचे, तर कत्तलखाने सुरू करा
विहिरीच्या स्वच्छतेचे काम शुक्रवारी सुरू झाल्यानंतर महापालिकेस नेमकी आजच कशी काय जाग आली, असा सवाल रहिवाशांनी केला. लोकांचे बळीच घ्यायचे असतील, तर महापालिकेने कत्तलखाने सुरू करावे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

महापालिका हद्दीत जवळपास १०० विहिरी आहेत. २०१५-१६ मध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने त्यावर मात करण्याकरिता महापालिकेने २५ कोटी रुपये खर्चून टंचाईचा कृती आराखडा तयार केला होता. तातडीने पाच कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली गेली.
नव्याने कूपनलिका टाकणे, विहिरी स्वच्छ करणे यावर हा निधी खर्च झाला. विहिरी स्वच्छ केल्यास त्यातील पाणी इतर कामांसाठी वापरता येईल, असा त्यामागचा उद्देश होता.
अपघातग्रस्त विहीर स्वच्छ करण्याची मागणी अनेकदा होऊनही तिचा पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश का केला नाही, हादेखील प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: After the death, the 'Remedies' program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.