मृत्यूनंतर त्या मृताचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 08:36 PM2020-07-05T20:36:26+5:302020-07-05T20:36:48+5:30
कुटुंबातील १६ जणांना पालिकेने केले क्वारंटाईन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना रिपोर्ट नसल्याने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने उपचारांअभावी मृत्यू झालेल्या त्या मृताचा रिपोर्ट अखेर पॉझिटिव्ह आला असून त्याच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता पुढचे सोपस्कार पाळण्यासाठी ठाणे महापालिकेने त्याच्या कुटुंबातील १६ जणांना क्वारंटाईन केले आहे. एखाद्या रुग्णाची ताब्यात अचानक बिघडल्यास रिपोर्ट येईपर्यंत हॉस्पिटल कोरोना रिपोर्ट शिवाय दाखलच करून घेत नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
घोडबंदर भागातील एका व्यक्तीला मागील काही दिवस त्रास सुरु होता. त्यामुळे त्याने 1 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जोर्पयत अहवाल येत नाही, तोर्पयत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. याच कालावधीत शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे, त्याच्या नातेवाईंकानी आधी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. अहवाल आला असेल तरच अॅम्ब्युलेन्स दिली जाईल असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे .त्यामुळे अखेर एका रिक्षावाल्याला विनंती केल्यानंतर रिक्षावाला घेऊन जाण्यास तयार झाला होता. जवळ जवळ दोन तास शहरातील प्रतीथयश तीन ते चार रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली होती . परंतु आधी कोरोनाचा अहवाल आणा मगच दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर जिल्हा शासकीय रुग्णालयात जाईपर्यंतच रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु झाला.
या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. तर पत्नी देखील पॉझिटिव्ह आली असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांना मात्र क्वारंटाईन करण्याचे सोपस्कार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. रुग्ण कोणत्याही रुग्णालयात गेल्यास त्यावर आधी उपचार करा असे पालिका प्रशासनाचे आदेश असताना या आदेशाची अंमलबजावणी मात्र कोणत्याही हॉस्पिटलकडून होत नसल्याने आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघणार आहे.