दिवा, ठाकुर्लीनंतर अंबरनाथ स्थानकाच्या कायापालटाला सुरुवात; डोंबिवलीकरांसाठी १५ डब्यांची लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 05:16 PM2019-03-02T17:16:24+5:302019-03-02T17:16:45+5:30
ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे रेल्वे सेवेवरील ताण सुसह्य करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
डोंबिवली – ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे रेल्वे सेवेवरील ताण सुसह्य करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्याची खा. डॉ. शिंदे यांची मागणी रेल्वेने पूर्ण केली असून डोंबिवलीकरांसाठी उद्या, रविवार ३ मार्चपासून १५ डब्यांची लोकल सेवेत दाखल होत आहे. त्याचबरोबर, सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण या मार्गावरील १२ डब्यांच्या चार फेऱ्यांचे परिवर्तनही १५ डब्यांच्या फेऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. दिवा आणि ठाकुर्ली नंतर आता अंबरनाथ स्थानकाच्या कायापालटाच्या कामालाही सुरुवात होत असून याअंतर्गत पश्चिम दिशेला होम प्लॅटफॉर्म, बुकिंग ऑफिस, पादचारी पुल, एस्कलेटर्स, स्वच्छतागृह, जुन्या प्रशासकीय इमारतीच्या जागी नवी इमारत आदी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. तसेच, दिवा स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मना जोडणाऱ्या कल्याण दिशेकडील नव्या पादचारी पुलाचे लोकार्पणही उद्या, रविवारी होत आहे.
ठाण्यापुढील लोकल सेवेवर सध्या असह्य ताण आहे. मध्य रेल्वेने सात वर्षांपूर्वी १५ डब्यांची एक लोकल सुरू केली, पण त्यात आजतागायत वाढ केली नाही. ठाण्यापुढे लोकल भरगच्च भरून धावत असून अति गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून प्रवासी मृत्यूमुखी तसेच आयुष्यभरासाठी अपंग झाल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. त्यामुळे ठाण्यापुढील प्रवाशांसाठी १५ डब्यांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे सातत्याने करत होते. या मागणीला यश येऊन डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर रविवार, ३ मार्चपासून १५ डब्यांच्या लोकलच्या दोन फेऱ्या सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर धावणाऱ्या १५ डब्यांच्या गाडीच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली असून १२ डब्यांच्या गाडीच्या चार फेऱ्यांचे परिवर्तन १५ डब्यांच्या गाडीत करण्यात आले आहे.
अंबरनाथ स्थानकाचा कायापालट
ज्या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म नाही, तेथील प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी आणि परतल्यानंतर स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म व्हावा, यासाठी डॉ. शिंदे यांनी खासदार झाल्यापासून पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार ठाकुर्ली स्थानकात गेल्या वर्षी होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. याचसोबत स्वच्छतागृह, बुकिंग ऑफिस, पादचारी पुल, एस्कलेटर्स अशा अनेक सुविधांमुळे ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट झाला. त्यापाठोपाठ आता कोपर स्थानकातही होम प्लॅटफॉर्मचे काम प्रगतीपथावर असून याच धर्तीवर अंबरनाथ स्थानकातही होम प्लॅटफॉर्मसह अन्य सुविधा पुरवण्याच्या खा. डॉ. शिंदे यांच्या मागणीला रेल्वेने मंजुरी दिली होती. या कामालाही प्रत्यक्ष सुरुवात रविवार, ३ मार्चपासून होत आहे.
दिवा स्थानकातील नव्या पादचारी पुलाचे लोकार्पण
दिवा स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मना जोडणारा एकमेव पादचारी पुल सध्या ठाणे दिशेला असून तो अरुंद आहे. त्यामुळे कल्याण दिशेकडे पादचारी पुल उभारण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. त्यानुसार काम सुरू झाले होते. हे काम आता पूर्ण झाले असून त्याचेही लोकार्पण रविवारी होणार आहे. त्याचप्रमाणे स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाचेही पूर्व दिशेला विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.