भाजपाला रोखण्यासाठी सर्वपक्षीय छुपी युती, शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याचे अर्ज भरल्यानंतर स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:53 AM2017-11-29T06:53:29+5:302017-11-29T06:53:45+5:30
ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायतींच्या निवडणुकीत काहीही करून भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कुणबी सेना, भारिप असे वेगवेगळे पक्ष एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले.
ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायतींच्या निवडणुकीत काहीही करून भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कुणबी सेना, भारिप असे वेगवेगळे पक्ष एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. शिवसेनेपासून श्रमजीवी संघटना तोडल्याचा लाभ भिवंडी तालुक्यात भाजपाला होण्याची शक्यता असल्याने आणि या तालुक्यातच जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा असल्याने भिवंडीच्या रणमैदानातच ठाणे जिल्ह्याच्या मिनी विधानसभेची निवडणूक लढली जाईल. बुधवारी अर्जांची छाननी होणार आहे. सोमवारी ४ डिसेंबरला किती उमेदवार माघार घेतात त्यावर प्रत्येक गट, गणातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. स्थानिक राजकारणाचा आणि भाजपाला रोखण्याचा विचार करून परस्परांसाठी काही जागा सोडत काही ठिकाणी कमकुवत उमेदवार देत अर्ज भरले गेले. दोन खासदारांसोबत तीन आमदार आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या रिंगणात उतरले आहेत. ग्रामीण भागातील काही पट्ट्यात शिवसेनेचा एकगठ्ठा मतदार आहे; तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार आहे. पण पूर्वी फोडलेली राष्ट्रवादी आणि आता श्रमजीवीच्या मदतीने या मतपेढ्यांना धक्का देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे परस्परांशी सहकार्य करून उमेदवार दिल्यानंतरही अन्य पक्षांना आदिवासी मतदार सांभाळणे आणि भाजपाच्या राजकीय समीकरणांना धक्का देण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान होणारा प्रचार त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने निरीक्षक नेमले आहेत. तसेच तक्रार निवारण कक्षही स्थापन केला आहे.
भाजपाविरोधात विविध पक्ष
आले एकत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : श्रमजीवी संघटना आणि रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला सोबत घेत भाजपाने भिवंडी तालुक्यात आपली सर्व ताकद एकवटल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप, कुणबी सेना एकत्र आले आहेत. या पक्षांनी थेट युतीची घोषणा केली नसली, तरी त्यांच्यात छुपा समझोता झाल्याचे मंगळवारी भरलेल्या अर्जावरून दिसून आले.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी समर्थकांसह गर्दी केली होती. पण सोमवारी जशी नेत्यांनी हजेरी लावली होती, तसे नेते न दिसल्याने त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. पोलीस बंदोबस्त मात्र चोख होता.
जिल्हा परिषदेचे ११ गट आणि पंचायत समितीच्या २२ गणांसाठी प्रांत कार्यालयात आणि उरलेले १० गट, २० गणांचे अर्ज कामतघर येथील वर्हाळादेवी हॉलमध्ये स्वीकारण्यात आले. सर्वाधिक संख्या असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भिवंडीच्या उमेदवाराकडे राहील, हे गृहीत धरून सर्व पक्षांनी भिवंडीवर लक्ष केंद्रित केले आहे.
खासदार कपील पाटील यांचा पुतण्या देवेष पुरूषोत्तम पाटील यांनी अंजूर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे कुंदन पाटील यांनी पूर्णा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार, आमदारपदाची निवडणूक लढविणाºया सुरेश (बाळा) म्हात्रे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर लक्ष ठेवून कोन गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख इंद्रपाल तरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अनंता भोईर, जयश्री भोईर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी सोमवारी राजीनामा दिल्याचा फटका मंगळवारी दिसून आला. त्यांचे समर्थक बाहेर पडले नाहीत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज म्हात्रे, जिल्हाप्रमुख मदन पाटील, उपजिल्हा अध्यक्ष विकास जाधव यांनीही अर्ज भरले.
मुरबाड तालुक्यातील लढाई अखेर दोन युतींमधील
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीची लढाई ही शिवसेना-राष्ट्रवादी युती विरूद्ध भाजप- आरपीआय आठवले गट, श्रमजीवी युतीतच लढली जाईल, असे मंगळवारी स्पष्ट झाले. काँग्रेससह अपक्षांनीही अर्ज भरले आहेत. पण मतविभागणीसाठीच काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी भरपूर गर्दी झाली होती. ती मुदत दोन तासांनी वाढवल्याचा निरोप उशिरा आल्यानंतर पुन्हा गर्दी वाढली. छाननी आणि माघारीनंतर ४ डिसेंबरला अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात गेलेले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुभाष घरत यांना धसई जिल्हा परिषद गटातून भाजपाने उमेदवारी दिली आहे.
त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपामधून दावेदार असलेले प्रमोद गायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांची पत्नी प्रगती यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केल्याने येथील निवडणूक रंगतदार बनली आहे. घरत यांनी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला; तर प्रमोद गायकर यांनी सोमवारी रात्री शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, आप्पा घुडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.घरत यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी आमदार दिगंबर विशे यांनी शिवसेनेची दुसरी फळी आमदार किसन कथोरे यांच्या बगलेत असल्याचा दावा केला. शिवसेनेत आता उरले कोण, असा प्रश्न त्यांनी केला. कथोर यांच्यामुळेच काँगे्रस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने मतविभागणीत भाजपाचा विजय सोपा झाल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपाने शक्तिप्रदर्शन करत दिले विरोधकांना प्रत्त्युत्तर
शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभा घेत सोमवारी शक्तिप्रदर्शन केल्याने भाजपा नेत्यांनीही मंगळवारी तसेच जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले. भाजपासोबत आरपीआयचा आठवले गट, श्रमजीवी संघटना असल्याचे जाहीर करण्यात आले.मुरबाड तालुक्यात शिवसेनेशी युतीची आमचा तयारी होती, पण खासदारकीची स्वप्ने पाहणाºया शिवसेनेतील एका नेत्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँगे्रसशी युती केल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला. जिल्हा परिषद, पंचायतीची सत्ता भाजपाला दिल्यास गावांचा विकास करून दाखवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी आमदार दिगंबर विशे, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाअध्यक्ष जयवंत सूर्यराव यांचीही भाषणे झाली. सभेनंतर म्हसा रोडवरून निघालेली रॅली तहसीलदार कार्यालयात पोहोचली. भाजपातर्फेपंचायत समितीसाठी १५ आणि जिल्हा परिषदेसाठी आठ अर्ज भरण्यात आले. एक जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रसने जिल्हा परिषदेसाठी सहा आणि पंचायतीसाठी बारा अर्ज भरण्यात आले. मित्रपक्ष शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायतीच्या चार जागा सोडण्यात आल्या आहेत. काँगे्रसने जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायतीच्या पाच जागांसाठी अर्ज भरले.
आरपीआय सेक्युलरने जिल्हा परिषदेसाठी तीन अर्ज दाखल केले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष एक जागा लढविणार आहे. मनसेने मात्र या निवडणुकीतून सपशेल माघार घेतल्याचे दिसून आले. अनेक अपक्षांनीही अर्ज भरले आहेत.
अर्ज भरण्याच्या वेळेत घोळ : जिल्हा परिषद, पंचायतीचे अर्ज भरण्यासाठी आधी दुपारी तीनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र नंतर ती वेळ संध्याकाळी पाचपर्यंत करण्यात आली. आधीच्या वेळेनुसार त्यांचे अर्ज वेळेत भरले गेले नाहीत, ते माघारी गेले होते. नंतर त्यांना पाचपर्यंत मुदत वाढल्याचे समजताच धावपळ उडाली. या घोळाबाबत निवडणूक विभागाशी संपर्क साधल्यावर आम्हालाच उशिरा कळल्याचे त्यांनी सांगितले.
शहापुरातील राजकारण मैत्रीपूर्ण लढतींचे
शहापूर : शहापुरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कुणबी सेना आणि भारिप यांच्या आघाडीने मंगळवारी अर्ज भरले. शिवसेना स्वबळावर लढते आहे, तर भाजपाने आरपीआयचा आठवले गट, श्रमजीवीला सोबत घेतले आहे. त्या अर्थाने तिरंगी लढत असली तरी अपक्ष, इतर छोट्या गटांनी माघार घेतली नाही; तर मात्र ती बहुरंगी होण्याची शक्यता आहे. तालुक्यात शिवसेना-राष्ट्रवादीची लढत मैत्रीपूर्ण होण्याची चर्चा रंगली आहे. पण तिला त्या पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायतीच्या २८ जागांसाठी २१० अर्ज भरले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेसाठी २४ आणि पंचायतीच्या २८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. बिरवाडी, वासिंद आणि खर्डी या तीन पंचायत समित्या काँग्रेससाठी सोडल्या आहेत. मोखावणे पंचायत समितीची जागा भारिपच्या वाट्याला आली आहे. कुणबी सेनेने या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असून त्या पक्षाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात उमेदवारी अर्ज भरले. भाजपाने रिपाइंच्या आठवले गटासाठी कसारा जिल्हा परिषद आणि मोखावणे, वासिंद (पूर्व), वासिंद (प.) या तीन पंचायत समितीच्या जागा सोडल्याची माहिती पक्षाचे तालुका अध्यक्ष जयवंत थोरात यांनी दिली. भाजपा जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायतीच्या २५ जागा लढवित आहे
महायुती फिसकटली
बहुजन विकास आघाडी, रिपाई, भारिप, संघर्ष सेना, मनसे यांची महायुती करण्याची चर्चा सुरू होती. पण जागावाटपातील दाव्यांमुळे ती फिसकटली. बहुजन विकास आघाडीने बिरवाडी, शिरोळ या दोन गटात आणि धसई, वासिंद, मोखावणे या गणात उमेदवार उभे केल्याचे