गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येत झाली वाढ; भिवंडी परिसरात प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:50 PM2020-09-07T23:50:18+5:302020-09-07T23:50:31+5:30
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने परिस्थिती चिघळली
- नितीन पंडित
भिवंडी : शासकीय यंत्रणेच्या कठोर प्रयत्नांनंतर आटोक्यात आलेली भिवंडीतील कोरोना रुग्णसंख्या आता पुन्हा वाढण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.
भिवंडी शहर व ग्रामीण भागांत सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी महापालिकेत काही बदल करण्यात आले. त्यानुसार, आयएएस दर्जाचा आयुक्त नियुक्त करून, तज्ज्ञ व अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्याचबरोबर कोविड सेंटर उभारणी व अॅण्टीजेन चाचण्यांवर महापालिका प्रशासनाने भर देत शहरातील कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आणले होते. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत होती.
शहरात १५ ते २0, तर ग्रामीण भागात दररोज २0 ते २५ रुग्णांची नोंद होत होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये रुग्ण कमी व बेड जास्त अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. मात्र, गणेशोत्सव काळात भिवंडीतील रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. गणेशोत्सव काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न झाल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे बोलले जात आहे. गणेशोत्सव काळात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी ४८ रुग्णांची वाढ झाली, तर ग्रामीण भागात तब्बल १00 रुग्ण वाढले आहेत.
भिवंडी शहर ग्रामीण भागात एकाच दिवसात १४८ रुग्ण सापडल्याने शासकीय यंत्रणेवर पुन्हा ताण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेपुढे पुन्हा एकदा रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान आहे. भिवंडी शहरात आतापर्यंत एकूण ४३४२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरातील २९0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात ४२७३ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ३४३८ रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत १४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.