ग्राम पंचायत मतदानानंतर कर्मचारी काेराेनाच्या भीतीने धास्तावले, चाचणीशिवाय बजावले कर्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:24 AM2021-01-18T07:24:07+5:302021-01-18T07:26:10+5:30
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी २ हजार ४१३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. त्यासाठी ४७९ मतदान केंद्रांवर दोन लाख ५० हजार मतदारांपैकी दोन लाख ८१० मतदारांनी (८०.२३ टक्के) मतदान केले. यामध्ये ९४ हजार ६०२ महिलांसह एक लाख ६ हजार २०८ पुरुष मतदार हाेते.
सुरेश लाेखंडे -
ठाणे - जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. यासाठी या ग्रामपंचायतींच्या गावपाड्यांमधील ४७९ मतदान केंद्रांवर दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केले. यासाठी कर्तव्य बजावणाऱ्यांमध्ये बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी (टेस्ट) किंवा अँटिजेन टेस्ट केली नाही आणि घरी येण्यापूर्वीही ती झाली नाही. त्यामुळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी २ हजार ४१३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. त्यासाठी ४७९ मतदान केंद्रांवर दोन लाख ५० हजार मतदारांपैकी दोन लाख ८१० मतदारांनी (८०.२३ टक्के) मतदान केले. यामध्ये ९४ हजार ६०२ महिलांसह एक लाख ६ हजार २०८ पुरुष मतदार हाेते. मतदान केंद्रांवर सुमारे दोन हजार ९०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी सेवा दिली. मात्र, त्यांच्या आणि मतदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यावरील या अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावर येण्याआधी व घरी जाण्यापूर्वी कोरोना टेस्ट करण्यात आली नाही. त्यामुळे या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मनात कोरोनाच्या भीतीची पाल चुकचुकत असल्याचे दिसते.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन या निवडणुकीत झालेले नाही. त्यात प्रशासनाने मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी पथकास कोरोना टेस्ट करण्याचे आदेशही दिले नसल्याचे समजते. आदेश दिले असते तर कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने चाचणी करून घेतली असती, असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. खबरदारीची उपाययोजना म्हणून या मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांस अंगदुखीची जाणीव होताच त्यावर तत्काळ उपाययोजनेचा सल्ला पथकातील काही जाणकारांनी दिला आहे. जिल्ह्यातील ४७९ मतदान केंद्रांवर बहुतांशी ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्थाही नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी आणि घरी येण्यापूर्वी कोरोना टेस्ट करून घेणे अपेक्षित होते. पण तसे झालेले नाही. कमीत कमी अँटिजेन टेस्ट होणे आवश्यक होते. मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्थाही नव्हती.
- कर्मचारी
कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने मतदार मास्क घालून यायचे. पण त्यांची ओळख पटवून घेण्यासाठी पोलिंग ऑफिसरला कर्तव्य करावे लागलेले आहे. त्यामुळे अँटिजेन टेस्ट मोफत करण्याची गरज आहे.
- कर्मचारी
निधीअभावी केंद्रावर सॅनिटायझर नसल्याचे ऐकायला मिळाले. त्यामुळे मतदार सॅनिटाइझ झाले नाहीत. कर्मचारी स्वत:चे सॅनिटायझर वापरत होते. मतदान केंद्रांवर काम केल्याचा भत्ताही मिळालेला नाही. या भत्याच्या रकमेसह मोफत कोरोना टेस्ट किंवा अँटिजेन टेस्ट होणे गरजेचे आहे.
- कर्मचारी
मतदान झाल्यानंतर आतापर्यंत तरी कोरोना संदर्भातील रिपोर्ट मिळालेला नाही. कोणातही लक्षणे दिसल्याचा अहवाल नाही. पण कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली होती. त्यांनी लक्षणे दिसल्याचा जिल्हा प्रशासनाकडे अहवाल आलेला नाही.
- राजाराम तवटे, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे