किराणावाल्यांनंतर आता खासगी लॅबवाल्यांची बिल्डरांवर वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 07:02 PM2020-07-31T19:02:41+5:302020-07-31T19:02:53+5:30
या एका टेस्टीसाठी 2800 रुपये दर ठेवला असून यात खासगी लॅबवाल्यांची चांदी होणार आहे तर बिल्डरांचे मात्र कंबरडे मोडणार आहे.
ठाणे - आधीच रिअल इस्टेटचे आर्थिक मंदीमुळे कंबरडे मोडले असतानाच आता चार ते पाच महिन्याच्या लॉकडाऊनमुळे हे क्षेत्र आणखीनच अडचणीत आले आहे. मात्र ठामपाचे काही अधिकाऱ्यांनी किराणा दुकानदारांनंतर आता शहरातील छोट्या मोठ्या बिल्डरांना त्यांच्याकडे असलेल्या बांधकाम मजूर, आणि कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट काही विशिष्ट खासगी लॅब कडून करवून घेण्याचे फर्मान काढले आहेत. या एका टेस्टीसाठी 2800 रुपये दर ठेवला असून यात खासगी लॅबवाल्यांची चांदी होणार आहे तर बिल्डरांचे मात्र कंबरडे मोडणार आहे.
शहरातील किराणा दुकानदारांनी त्यांच्या सह त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या कोविड टेस्ट विशिष्ट खासगी लॅब कडून करण्याची पत्रके वाटल्यानंतर आता शहरातील बांधकामे सुरू असलेल्या साईड वरील छोट्या मोठ्या विकासकांनाही त्यांच्या कडील बांधकाम मजूर, कामगार आणि इतर स्टाफ यांच्या कोविड टेस्ट करण्याचे फर्मान काढले आहे. त्यासाठी शहरातील इन्फेवंशम लॅब, मिलेनिअम लॅब, कृष्णा डायग्नोस्टिक, सबर्बन डायग्नोस्टिक, थायरॉकेअर लॅब, मेट्रो पॉलिस लॅब आणि एसआरएल डायग्नोस्टिक या खासगी लॅबना आवतान देण्यात आले आहे. यासाठी पालिकेचे सात कर्मचाऱ्यांना नेमले असून प्रत्येक टेस्टसाठी 2800 रुपये दर ठेवण्यात आला आहे. विकासकांनी या टेस्ट केल्या नाहीत तर साथीरोग कायद्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात सांगण्यात आले आहे.
या सगळ्या मागे पालिकेचेच काही अधिकारी आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप काही विकासकांनी केला आहे. बिल्डर म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असाच समज पालिकेचा असून, आधीच आमची इंडस्ट्री डबघाईला आली असतांना आम्ही कशीबशी ही इंडस्ट्री जगविण्यासाठी धडपडतोय. पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल आमच्याकडून मिळत असतो. खरं तर या अडचणीच्या काळात या टेस्ट पालिकेने मोफत करायला हव्यात किंवा मोफत अँटीजन टेस्ट करण्याची मागणी या विकासकांनी केली आहे.