केतकीनंतर नितीन भामरेही ठाणे पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांवरील पोस्ट भोवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 03:43 PM2022-05-18T15:43:39+5:302022-05-18T15:44:24+5:30
निखिल भामरेला आज ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला नाशिक कोर्टात आणले असताना ठाणे क्राईम ब्रँचने त्याचा ताबा घेतला आहे
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असताना गोरेगाव पोलिसांनी आज तिचा ताबा घेतला आहे. तर, दुसरीकडे नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या निखील भामरेचा ठाणे पोलिसांनी ताबा घेतला आहे. निखील भामरेनेही शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
निखिल भामरेला आज ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला नाशिक कोर्टात आणले असताना ठाणे क्राईम ब्रँचने त्याचा ताबा घेतला आहे. ठाणे पोलिसांकडून निखिलला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निखील भामरेच्या ट्विटचा फोटो शेअर करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती.
निखिल भामरे नावाचा एक तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करून केलेलं आक्षेपार्ह ट्विट होतं. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, "वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग." या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर, ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
केतकी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाकडून कोठडी देण्यात आली असून गोरेगाव पोलीसांनी केतकीचा ताबा घेतला आहे. आता गोरेगाव पोलीस मुंबईकडे रवाना झाले आहेत.