पैशांसाठी हत्या केल्याने मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपायाला काशिमीरा पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 09:20 PM2017-11-02T21:20:19+5:302017-11-02T21:22:22+5:30
मीरा रोड - उसने १ लाख रुपये वसूल करण्यासाठी एका रेती व्यावसायिकाचे आपल्या घरात नेऊन मारहण करून त्याची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील शिपायास काशिमीरा पोलिसांनी अटक केली.
मीरा रोड - उसने १ लाख रुपये वसूल करण्यासाठी एका रेती व्यावसायिकाचे आपल्या घरात नेऊन मारहण करून त्याची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील शिपायास काशिमीरा पोलिसांनी अटक केली. आरोपीस ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा गावात राहणारा मुस्तफा नजीर शेख (३५) हा रेती पुरवठ्याचा व्यवसाय करायचा. बुधवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह घोडबंदर गावातील मार्गावर वेलकर फार्म मागे असलेल्या गटारात पडलेला आढळून आला. मुस्तफाने मुंबई पोलिसांच्या कांदिवली पोलीस ठाण्यातील शिपाई बबलू उर्फ मुश्ताक अब्दुल मुलानी (४७) रा. पारिजात अपार्टमेंट, विजय पार्क, मीरा रोड याच्याकडून एक लाख रुपये उसने घेतलेले होते. सदर पैशांसाठी मुश्ताक हा मुस्तफाकडे सातत्याने तगादा लावत होता. तर मुस्तफा मात्र टाळाटाळ करत होता. तो मुश्ताकचे फोन देखील घेत नसे. ३१ आॅक्टोबरच्या दुपारी २ वाजता माशाचा पाडा येथील गॅरेजमध्ये मुस्तफा असल्याचे कळताच मुश्ताकने त्याला तेथे गाठले. तेथे त्याने पैशांची मागणी केली. मुस्तफा याला घेऊन तो राहत असलेल्या इमारतीत गेला.
मुस्तफा हा एटीएम कार्ड आणण्यासाठी घरी गेला तर मुश्ताक हा इमारतीखालीच थांबला होता. मुस्तफा कार्ड घेऊन खाली आला असता मुश्ताकने त्याला माझ्या घरी चल व आई वडिलांना सांग की, पैसे देतोय. मुस्तफा मुश्ताक सोबत त्याच्या घरी गेला असता तेथे मुश्ताकने त्याला दमदाटी करुन बांधुन ठेवले व बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. त्याला मारहाण करण्यासह गळा आवळून त्याची हत्या केली.
मुस्तफा मरण पावल्याचे कळताच मुश्ताकने भाऊ मुनीरला सोबत घेतले. दुचाकीवर दोघांच्या मध्ये मुस्तफाचा मृतदेह बसवुन घोडबदर गावच्या मार्गावरील गटारात मृतदेह टाकुन निघुन गेले. दरम्यान घरी एटीएम कार्ड घेण्यासाठी मुस्तफा गेला असता तेव्हा त्याने घरच्यांना मुश्ताक आल्याचे व त्याच्या सोबत घरी जात असल्याचे सांगीतले होते. ३१ आॅक्टोबर रोजी मुस्तफा गेला तो परत न आल्याने त्याची हरवल्याची तक्रार देखील काशिमीरा पोलीसात कुटुंबियांनी दिली होती. पण त्याचा मृतदेह सापडल्याने हत्ये मागे मुश्ताकचा हात असल्याचा दाट संशय पोलीसांसह कुटुंबियांना पण आला. वरिष्ठ निरीक्षक विलास सानप व पोलीस पथकाने आज गुरुवारी मुश्ताक याला मीरा रोड भागातुन अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुश्ताक व मुस्तफा यांची गेल्या ७ ते ८ वर्षांपासूनची ओळख होती. दोघेही दहिसर येथे जवळजवळ रहायचे. मुस्तफाने मुश्ताककडून एक लाख रुपये उसने घेतले होते. पण तो पैसे परत देत नसल्याने मुश्ताकने त्याची हत्या केली. या प्रकरणात मुश्ताकचा भाऊ मुनीर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झालेली नव्हती.