लॉकडाऊननंतर उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:04+5:302021-09-27T04:44:04+5:30
उल्हासनगर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरात लॉकडाऊन काळात गुन्हेगारीची संख्या कमी झाली होती. मात्र, काही महिन्यांत हत्या, बलात्कार, चोऱ्या, ...
उल्हासनगर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरात लॉकडाऊन काळात गुन्हेगारीची संख्या कमी झाली होती. मात्र, काही महिन्यांत हत्या, बलात्कार, चोऱ्या, हाणामारी, घरफोडी, फसवणूक आदींच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. पोलीस या प्रकाराने हैराण झाले असून, नागरिकांच्या मनातही भीतीने घर केले आहे.
उल्हासनगर गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शहर आहे. दर मंगळवारी येथे हत्या झाल्याची चर्चा आजही होते. लाॅकडाऊनच्या काळात शहरातील गुन्हेगारी एखादाअपवाद वगळता पूर्णपणे थांबली हाेती. मात्र, लाॅकडाऊन उठताच त्यात माेठी वाढ झाली असून, पोलीस हैराण झाले आहेत. गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापे मारून कारवाई केली. जुगार व अंमली पदार्थांच्या नशेतून गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जात असून, गुन्हेगारांचे वय १५ वर्षांपासून २५ वयोगटामधील असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नंग्या तलवारीने भररस्त्यात केक कापून हाणामारी करणे, दुकान व घरफोडी, हत्या, बलात्कार, फसवणूक, वाहनचोरी आदींच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने नागरिकांना शहरात भरदिवसा फिरतानाही भीती वाटत आहे.
उल्हासनगर रेल्वेस्टेशनच्या स्कायवॉकवर रात्री ९ वाजता अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन शेजारच्या बंद रेल्वे क्वाटर्समध्ये बलात्कार करणे, सख्ख्या मामाने आठ वर्षांच्या मुलीवर केलेला बलात्कार, गायकवाडपाड्यात पत्नीची हत्या, क्षुल्लक व वर्चस्वाच्या वादातून मित्राचा भरदिवसा साथीदारांच्या मदतीने खून करणे, मोबाईल व इयर फोन घेतल्याच्या वादातून मित्राची हत्या आदी घटना गेल्या आठवड्यात घडल्याने शहर हादरले. दाेन महिन्यांत हाणामारी, चोऱ्या, फसवणूक, वाहन चोरी आदी गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. पोलिसांनी खून व बलात्कार आदी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहे. एकूण गुन्ह्यांच्या संख्येबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ताे हाेऊ शकला नाही. पोलीस उपायुक्त कार्यालयाने गुन्ह्यांच्या संख्येत झालेल्या वाढीबाबत माहिती देण्याचे टाळले.
चौकट
उपमहापाैरांनाही वाटते असुरक्षित
शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे रिपब्लिकन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि उल्हासनगरचे उपमहापाैर भगवान भालेराव यांनी शनिवारपासून स्वसंरक्षणासाठी दाेन बंदूकधारी खासगी जवान ठेवले असल्याची माहिती दिली. त्यामुळे शहराचा उपमहापाैरही सुरक्षित नसल्याची चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी गुन्हेगारांना आश्रय दिला असल्याने तेही गुन्हेगारीबाबत आवाज उठवताना दिसत नाहीत.