लॉकडाऊनंतर डोंबिवलीत होणार पासपोर्ट सेवा केंद्र, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:13 PM2020-04-29T17:13:12+5:302020-04-29T17:28:35+5:30
केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो नागरिकांच्या सोयीसाठी मतदारसंघात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेरीस डोंबिवली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेले लॉकडाउन उठवण्यात आल्यानंतर लवकरात लवकर हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कळवण्यात आले आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली होती. परंतु, हे सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आखून दिलेल्या जागेच्या निकषांची पूर्तता करण्याबाबत काही अडचणी येत होत्या. त्यासंदर्भात देखील खासदार डॉ. शिंदे यांनी टपाल खात्याशी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. परराष्ट्र खात्याचे तत्कालीन सचिव ज्ञानेश्वर मुळे, टपाल खात्याचे तत्कालीन मंत्री मनोज सिन्हा, विद्यमान राज्यमंत्री संजय धोत्रे, तसेच टपाल खात्याच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसमध्ये सदरचे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
या प्रयत्नांना आता यश आले असून लॉकडाउन उठल्यानंतर सदरचे सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सर्व तयारी झाली असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने खासदार डॉ. शिंदे यांना कळवले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सुमारे २० ते २५ लाख नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यांना पासपोर्ट विषयक कामासाठी आता ठाणे किंवा मुंबईपर्यंत हेलपाटे मारण्याची आवश्यकता उरणार नाही, अशा शब्दांत खासदार डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.