माझ्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत पारदर्शकता येईल

By admin | Published: October 12, 2015 05:21 AM2015-10-12T05:21:39+5:302015-10-12T05:21:39+5:30

बांधकाम व्यावसायिकांना एकाच प्रकल्पासाठी ७० ते ८० ठिकाणी परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

After my death, there will be transparency in the system | माझ्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत पारदर्शकता येईल

माझ्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत पारदर्शकता येईल

Next

ठाणे : बांधकाम व्यावसायिकांना एकाच प्रकल्पासाठी ७० ते ८० ठिकाणी परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. बांधकाम व्यावसायिकांचे क्षेत्र आणि शासकीय यंत्रणा यांच्यात पारदर्शकता आली पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत काही सुधारणा होतील आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत नेते आणि अधिकाऱ्यांबद्दलची प्रचंड उद्विग्नता कॉसमॉसचे मालक सूरज परमार यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
कै. सूरज यांनी लिहिलेली सुमारे २५ पानांची नोट कासारवडवली पोलिसांना घटनास्थळावर मिळाली आहे. या चिठ्ठीत त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना नेते, पालिका अधिकारी, तसेच शासकीय यंत्रणेतील अधिकारी कसे अडथळे आणून त्रास देतात, याबाबतचा उल्लेख आहे.
बिल्डर म्हणजे एकप्रकारे ‘बळीचा बकरा’ असल्याचे सर्वच यंत्रणांकडून ठरविले गेले आहे. हा बिल्डरांबद्दलचा दृष्टिकोन शासकीय यंत्रणांनी बदलला पाहिजे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे एक चांगले अधिकारी आहेत, पण इतरांचे काय? राजकीय नेते आणि पालिकेतील अधिकाऱ्यांच्या ‘डिमांड’ वाढल्या. त्या मला पूर्ण करायच्या नव्हत्या. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला, असेही या पत्रात म्हटले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. त्यांनी काही नेत्यांची नावेही लिहिली आहेत. ती खोडून यांचा कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो, म्हणून ती डिलीट करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पत्रातील उल्लेखाप्रमाणे त्यांना नेमकी कोणत्या अधिकाऱ्याकडून अडवणूक केली जात होती का? कोणत्या नेत्याने त्यांचे काम केल्यानंतर त्यांच्या डिमांड वाढल्या. ठाणे महापालिकेत त्यांचा कोणता प्रकल्प कशासाठी रखडला? त्यासाठी त्यांनी कोणाकडे चर्चा केली? त्यात काय अनियमितता आहे? याचबरोबर त्यांच्या लॅपटॉपमधील ई-मेल्स आणि मोबाइल कॉल्स, तसेच मेसेजेसमधील तपशिलाचीही चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी दिली.
परमार प्रकरणामुळे गोल्डन गँग धास्तावली!
ठाणे : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रसंगी आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे ठाणे महापालिकेतील सर्वपक्षीय ‘गोल्डन गँग’ आता धास्तावली आहे. विशेष म्हणजे या गँगमध्ये कोण आहेत, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची ‘सेटिंग’ची कामे केली जातात, हे उघड गुपित असले, तरी त्याबद्दल उघड आणि अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही.
परमार यांनी आत्महत्येपूर्वी जी सुमारे २५ पानांची ‘नोट’ लिहून ठेवली आहे, त्यातही खाडाखोड असल्यामुळे ती नावे कोणती आहेत, ती नावे खोडण्यामागचे कारणही आपल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना कोणी त्रास देऊ नये, असे असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. त्यांनी ज्या अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे, त्यामध्ये या कथित ‘गोल्डन गँग’मधील नेत्यांच्या नावांचा उल्लेख आहे, परंतु त्यातही खाडाखोड असल्यामुळे ‘त्या’ नावांवर शिक्कामोर्तब झालेले नाही.
मग इतके चर्चेत असूनही चारचौघांमध्ये आपण त्यातले नसल्याचा आव आणत फिरणारी ही नेते मंडळी कोण आहेत, त्यांनी नेमक्या कोणाच्या आणि काय ‘सेटिंग’ केल्या, याची आता पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
त्यामुळे एखादा प्रस्ताव
महासभेत चर्चेला आला, तर तो मंजूर करायचा की नाही, त्याचा पाठपुरावा करायचा की नाही की, त्यात
खोडा आणायचा, याबाबतचे निर्णय याच गँगमधून पुढे येतात.
अर्थात, टक्केवारी ठरली की, हाच विरोध किंवा अडथळा बासनात गुंडाळला जातो.
परमार यांच्या ‘कॉसमॉस’ या प्रकल्पाची कामे कोणत्या ठिकाणी अडली होती, तिथे त्यांना पालिकेच्या कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात होता, त्यांच्याकडे कोणी खंडणीची मागणी केली होती का, त्यांच्याकडे ‘सेटिंग’साठी कोणी चर्चा केली होती का? अशा सर्वच बाजूंनी कासारवडवली पोलिसांकडून चौकशी केली जात असल्यामुळे ठाण्यातील या कथित ‘गोल्डन गँग’मध्येही धास्तीचे वातावरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: After my death, there will be transparency in the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.