आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 01:53 PM2019-03-15T13:53:07+5:302019-03-15T13:53:49+5:30

दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते.

After our government comes, the bullet train will be canceled and the funds will be used for the suburban railway. Jitendra Awhad | आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार- जितेंद्र आव्हाड

आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार- जितेंद्र आव्हाड

Next

ठाणे - दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पूल आणि रस्त्यांवरील पूल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारण्याऐवजी चालणाऱ्या प्रवाशांना दोष देत आहेत.

असा निर्लज्जपणा आणि मग्रुरी प्रथमच अनुभवायला मिळत आहे. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे गरजेचे आहे. मात्र, तेच केले जात नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर प्रथम बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार असून, जाहीरनाम्यामध्येही तसे नमूद करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, सीएसटी पुल दुर्घटनेतील मृतांना 25 लाख आणि जखमींना 15 लाखांचे अर्थसाह्य देण्यात यावे, अशीही मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.

गेल्या 5 वर्षांत रेल्वे प्रवाशांची आणि रेल्वेसेवेची दुर्दशा झाली आहे. कर्जत-कसारा ते सीएसटी; पनवेल ते सीएसटी आणि विरार ते चर्चगेट असा प्रवास करणारे चाकरमानी जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये तीन पूल कोसळले. पण त्याचे या राजकीय व्यवस्थेला कसलेही सोयरसुतक नाही. हा अपघात प्रवाशांच्या चुकीमुळे झाला असल्याचा दावा हे लोक करीत आहेत. यावरून त्यांच्यातील मग्रुरीच दिसून येत आहे. रेल्वेच्या सुधारणा करण्याऐवजी प्रवाशांनाच दोष देण्याची ही कृती अत्यंत असंवेदनशील आणि बेशरमपणाची आहे.

मुंबई ठाण्यातील रेल्वेचे पूल, रेल्वेशी संलग्न असलेले पूल, रस्त्यांवरील पूल यांना आता जवळपास 50 ते 70 वर्षे झालेले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामध्ये टिळक पूल असो किंवा कोपरीचा पूल! कोपरीचा पूल तर अत्यंत जर्जर झालेला असून रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना 5 नोव्हेंबर 2015 रोजी पत्र लिहून या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.

या पत्राला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. लोकांचे जीव जाण्याचे वाट हे सरकार पाहत आहे का? गरीबांचा जीव हा जीव नसतो का? धोकादायक फलक लावण्याचेही औदार्यही दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे रेल्वे, रेल्वेशी संलग्न आणि रस्त्यावरील सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढावी; सकाळी आणि सायंकाळी रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करावे, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान, एकीकडे दररोज दोनशे अपघात होत आहेत. या दुर्घटनांमध्ये लोक मारले जात असताना जगाच्या बाजारात हा देश विकण्यासाठी हे सरकार बुलेट ट्रेन आणू पाहत आहे. हा प्रकल्प मुंबई, ठाणे-पालघरवासीयांच्या काही कामाचा नसतानाही तो लादला जात आहे. त्यामुळे तो तत्काळ रद्द करावा आणि त्यासाठी वापरण्यात येणारा निधी मुंबई प्रांतीय रेल्वे सुधारणेसाठी वापरावा, अशी मागणी करुन आमचे सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन तत्काळ रद्द करून तो निधी ठाणे, मुंबई रेल्वेसेवा आणि रेल्वेशी संलग्न असलेल्या सेवांसाठी वापरण्यात येईल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Web Title: After our government comes, the bullet train will be canceled and the funds will be used for the suburban railway. Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.