खड्डेबळींनंतर केडीएमसीला उपरती, स्थायी समिती सदस्यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:56 AM2018-07-17T02:56:42+5:302018-07-17T02:56:53+5:30
कल्याण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्यानंतर अखेर केडीएमसीला उपरती झाली आहे.
कल्याण : कल्याण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्यानंतर अखेर केडीएमसीला उपरती झाली आहे. स्थायी समितीने रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी १५ कोटी रुपये खर्चाच्या कामांना सोमवारी मंजुरी दिली. हा प्रस्ताव वाचून कायम करावा, असे आदेश स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला आयुक्त गोविंद बोडके यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त सभेला हजर असतात. परंतु, रस्तेदुरुस्ती व देखभालीचा विषय महत्त्वाचा असल्याने दामले यांच्या विनंतीनुसार बोडके सभेला उपस्थित राहिले. पाच जणांचे बळी गेल्यावर रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीचे विषय सोमवारी मंजुरीस आले. या दिरंगाईबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. डांबर आणि आॅइल मिक्स करून निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. तेचतेच कंत्राटदार काम करत असून ते कामाचा दर्जा राखत नाहीत. कंत्राटदार चोर आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, अशी टीका रमेश म्हात्रे यांनी केली.
निविदा प्रक्रियेमुळे कामाला विलंब होतो. डांबर प्लांट ३० किलोमीटरच्या अंतरात असावा, अशी अट कंत्राटदाराला घातली जाते. त्यामुळे लोकल कंत्राटदार येतात. ही अट शिथिल केल्यास बाहेरचे कंत्राटदार येतील.
कंत्राटदारांकडून एकदाच त्याची कागदपत्रे व अनामत रक्कम भरून घ्यावी. त्यामुळे निविदा प्रक्रियेचा वेळ वाचेल. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कोल्ड डांबर वापरल्यासही पावसाळ्यात खड्डे बुजवता येतील. त्या महापालिकेचा कोल्ड डांबराचा प्लांट वरळीत आहे. मुंबई महापालिकेने फेअर मार्केट दर ठरवलेले आहेत. आपण जिल्हा बांधकाम विभागाच्या डीएसआर रेटवर अवलंबून असतो. आपल्या महापालिकेनेही स्वत:च दर ठरवावेत. हे दर ठरवल्यास निविदा जास्त दराच्या येणार नाहीत, याकडे दीपेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले.
बोडके म्हणाले की, महापालिकेच्या अर्थसंकल्पास एप्रिलमध्ये मंजुरी मिळाली. त्याची पुस्तिका छापून येण्यास उशीर झाला. पुस्तिका छापल्याशिवाय लेखा विभागाची मंजुरी मिळत नाही. महापालिकेने त्यानंतर रस्तेदुरुस्ती व देखभालीसाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्यांना दोनदा प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्या वेळेस प्रतिसाद मिळाला, मात्र त्या जास्त दराच्या होत्या. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कंत्राटदारांशी चर्चा करून त्या निविदा सात ते आठ टक्के दरावर आणल्या. परंतु, कोकण पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे जिल्हाधिकाºयांमार्फत निवडणूक आयोगाकडे रस्त्यांच्या कामाविषयी अट शिथिल करा, असा पाठपुरावा केला होता. मात्र, त्याला निवडणूक आयोगाने परवानगी दिली नाही. त्यामुळे प्रलंबित असलेला विषय आजच्या सभेत मंजुरीस आला आहे. मंजुरीअभावी काम थांबलेले नाही. आजही खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी, केडीएमसीतील रस्ते, असा हद्दीचा वाद बाजूला ठेवून भरपावसात खडी, रेडीमिक्सद्वारे खड्डे युद्धपातळीवर बुजवले जात आहेत. पावसाने उघडीप घेताच डांबराने खड्डे बुजवले जातील.
दामले म्हणाले, दरवर्षी खड्ड्यांचा विषय गाजतो. या कामाच्या निविदा मार्चअखेरीस काढून त्याची कामे पावसाळ्यापूर्वीच सुरू झाल्यास ही समस्या सुटू शकेल. तसेच आयुक्तांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून विशेष बाब म्हणून खड्डे बुजवले पाहिजेत.
>‘कारणे दाखवा’ नोटीस
कल्याण : खड्डे बळींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, सात दिवसांत नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कुलकर्णी यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरातील खड्ड्यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, १४ जुलैला पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी कुलकर्णी यांची खरडपट्टी काढली होती. तसेच आयुक्तांना कुलकर्णी यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश दिले होते. बेजबाबदार अधिकाºयांचे निलंबन करून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असेही म्हटले होते.
दरम्यान, त्यानुसार आयुक्तांनी त्याच दिवशी सायंकाळी ही नोटीस बजावली आहे. त्यात कोणत्या रस्त्यावर काय काम केले, याचा तपशील मागितला होता. कुलकर्णी यांनी नोटिशीला उत्तर दिले आहे. मात्र, आयुक्तांनी ते पाहिलेले नाही. मंगळवारी ते पाहून कुलकर्णी यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्याविरोधात कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.
>खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसचा ठिय्या
केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चार जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसने आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कांचन कुलकर्णी, राहुल काटकर, शबाना शेख, शकील शेख, उज्ज्वला पाटील, धनश्री टेंबुलकर, सीमा खान आदी सहभागी झाले. यावेळी त्यांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. खड्डे त्वरित बुजवावेत. मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी. खड्डे न बुजवल्याने त्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना निलंबित करावे. खड्डे न बुजवणाºया कंत्राटदाराचे बिल रद्द करावे. त्याला काळ्या यादीत टाकावे, अशा विविध मागण्या ४८ तासांच्या आत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसतर्फे यावेळी देण्यात आला.
>त्रस्त नागरिकांचे खड्ड्यांत वृक्षारोपण
कल्याण : शहरातील खड्ड्यांच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी शक्तिवान बेतुरकर चौक ते राम मंदिर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावल्याचे पाहावयास मिळाले. नेमके हे वृक्षारोपण कोणी केले, याची माहिती मिळाली नसली तरी खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनीच हा संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे.
>अभियंत्यांना केली विचारणा
द्वारली येथील खड्ड्यांमुळे अण्णाचा मृत्यू झाला होता. तो मुद्दा कुणाल पाटील यांनी मांडला. त्यावर बोडके यांनी तेथे खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले. मात्र, काम बंद आहे. थोड्या वेळापुरतेच ते सुरू होते, असे पाटील म्हणाले. त्यामुळे बोडके यांनी याबाबत शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली.
>२७ गावांमधील रस्त्यांसाठी तीन कोटी
२७ गावांच्या ई प्रभागांतर्गत येणारे रस्ते जोरदार पावसामुळे सगळ्यात जास्त खराब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींपैकी दोन कोटी ९७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.