दुकानदारांनंतर आता बिल्डरांकडे महानगरपालिकेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:32 AM2020-08-01T01:32:29+5:302020-08-01T01:32:44+5:30
मजूर, कर्मचाऱ्यांची चाचणी : खाजगी लॅबला दिले झुकते माप?
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आर्थिक मंदीमुळे रिअल इस्टेटचे आधीच कंबरडे मोडले असताना, आता चार ते पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे हे क्षेत्र आणखीनच अडचणीत आले आहे. मात्र, ठामपाच्या काही अधिकाऱ्यांनी किराणा दुकानदारांनंतर आता शहरातील छोट्यामोठ्या बिल्डरांना त्यांच्याकडे असलेल्या बांधकाम मजुरांसह कर्मचाºयांची कोविड टेस्ट काही विशिष्ट खासगी लॅबकडून करवून घेण्याचे फर्मान सोडले आहे. यात खासगी लॅबवाल्यांची चांदी होणार असून बिल्डरांचे मात्र कंबरडे मोडणार आहे.
कोरोना टेस्टसाठी शहरातील इन्फेवंशम लॅब, मिलेनिअम लॅब, कृष्णा डायग्नोस्टिक, सबर्बन डायग्नोस्टिक, थायरॉकेअर लॅब, मेट्रो पॉलिस लॅब आणि एसआरएल डायग्नोस्टिक या खासगी लॅबना महानगरपालिकेने आवतन दिले आहे.
यासाठी पालिकेच्या सात कर्मचाºयांना नेमले असून प्रत्येक टेस्टसाठी २८०० रुपये दर ठेवण्यात आला आहे. विकासकांनी या टेस्ट केल्या नाहीत, तर साथरोग कायद्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशाद्वारे स्पष्ट केल्याने बांधकाम व्यावसायिकांना टेस्टशिवाय पर्याय नाही.
उखळ पांढरे करण्याचा अधिकाºयांचा डाव
खाजगी लॅबमध्ये टेस्टची सक्ती करुन पालिकेचे काही अधिकारी उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप काही विकासकांनी केला आहे.
बिल्डर म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असाच समज पालिकेचा आहे. आधीच आमची इंडस्ट्री डबघाईला आली आहे. हा उद्योग टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कशीबशी धडपड करत आहोत.
महापालिकेला मोठा महसूल आमच्याकडून मिळत असतो. खरेतर, या अडचणीच्या काळात या टेस्ट पालिकेने मोफत करायला हव्यात किंवा मोफत अॅण्टीजन टेस्ट करण्याची मागणी या विकासकांनी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरिक्षततेच्या दृष्टिकोनातून विकासकांना मजुरांची तपासणी करण्यास सांगितले आहे. बांधकाम साईटवर शेकडो लोक काम करतात. त्यातील एखाद्यास संसर्ग असल्यास त्याची लागण अन्य मजुरांना होण्याची भीती आहे. त्यास आळा घालण्यासाठी मजुरांच्या तपासण्या करु न घेण्यास सांगितलेले आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे, मनपा