अखेर आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर शहरातील हॉटेल, बारवाल्यांनी बंद घेतला मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:33 PM2018-03-07T16:33:12+5:302018-03-07T16:33:12+5:30
ठाण्यातील सुमारे ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. आयुक्तांनी पॅनेल्टी चार्जेस कमी करण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला.
ठाणे - महापालिकेच्या अग्नीशमन दलाने नोटीस देवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणा ऱ्या ८६ हॉटेल व बारपैकी ३६ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्नीशमन विभागाने केली होती. परंतु त्यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवार पासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून बंद पुकारला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही बंदची हाक कायम ठेवण्यात आली होती. परंतु बुधवारी दुपारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर हॉटेल व्याविसायिकांनी बंद मागे घेतला आहे. आयुक्तांनी अॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वास दिल्यानंतर आणि सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिल्याची माहिती हॉटेल, बार असोसिएशनने दिली आहे. त्यानंतर अखेर हा बंद मागे घेण्यात आला आहे.
अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्यावतीने नोटीसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर शनिवारी पासून मंगळवार पर्यंत ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले होते. परंतु, अग्निशमन दलाच्या जाचक अटीच्या विरोधात आणि पॅनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवार पासून बंदची हाक दिली होती.
दरम्यान बुधवारी दुपारी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयुक्त आणि हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्ठ मंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीला अग्निशमन विभाग, आस्थापना आणि शहर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तब्बल दिड तास ही बैठक चालली. त्यानंतर आयुक्तांनी अॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्या हॉटेल, बारवाल्यांनी अग्निशमन दलाच्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नसले त्यांनी ती पुर्तता करावी असेही आश्वासन दिले. याशिवाय ज्या हॉटेल बारला आतापर्यंत सील ठोकण्यात आले होते, ते सील काढण्याचे आदेशही दिले असल्याची माहिती हॉटेल बार असोसिएशनने दिली.
आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बरोबर समाधानकारक चर्चा झाली असून त्यांनी पॅनेल्टी कमी करण्याचे आश्वासन दिल्याने आणि सील ठोकण्यात आलेले हॉटेल तत्काळ सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला आहे.
(रत्नाकर शेट्टी - हॉटेल, बार असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी)
हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा होऊन त्यांच्या मागणीचा विचार करुन जे चार्जेस लावण्यात आले होते. त्याचे आता स्लॅब करण्यात आले असून, पूर्वीचे असलेले चार्जेस कमी करण्यात आले आहेत. तसेच फायर एनओसी बाबतही पुर्तता करण्याच्या सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
(संजीव जयस्वाल - आयुक्त, ठामपा)
असे असणार चार्जेसचे स्लॅब
यापूर्वी थेट २५ लाखापर्यंत अॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स भरण्याच्या नोटीसा हॉटेल, बारवाल्यांना बजावण्यात आल्या होत्या. परंतु केवळ ठाणे महापालिका हद्दीतच अशा पध्दतीने ही वसुली केली जात असल्याचा मुद्दा हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला होता. त्यानुसार आता ५०० स्केअर फुटापर्यंत - २५ हजार, ५०० ते दोन हजार पर्यंत - १ लाख, दोन हजार ते पाच हजारपर्यंत - २ लाख आणि पाच हजार स्केअरफुटाच्या पुढील बांधकामासाठी ५ लाख असे स्लॅब आता तयार करण्यात आले आहेत.