ठाण्यानंतर अंबरनाथमध्येही परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 00:04 IST2021-09-09T00:03:58+5:302021-09-09T00:04:46+5:30
पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण.

ठाण्यानंतर अंबरनाथमध्येही परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी
अंबरनाथ : ठाणे शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे. असं असतानाच आता अंबरनाथमध्येसुद्धा मुजोर परप्रांतीय फेरीवाल्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बस्तान मांडलं आहे. गर्दीच्या वेळी तर फेरीवाल्यांच्या उच्छादामुळे प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना चालायलाही जागा उरत नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. यावेळी फेरीवाल्यांना त्यांच्या पाट्या आणि अन्य सामान उचलण्यास हे कर्मचारी सांगत होते.
मात्र याच दरम्यान काही परप्रांतीय मुजोर फेरीवाले त्याठिकाणी आले आणि त्यांनी अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केली. अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी आनंद भिवाल, उमेश जहागिरदार, लक्ष्मण फर्डे आणि चालक नरेश पोटाळे या चौघांना यावेळी धक्काबुक्की, शिवीगाळ आणि अक्षरशः रस्त्यावर पाडून मारहाण करण्यात आली. या सगळ्यादरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात घेऊन फिर्याद देण्यास सांगितले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथ नगर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी कच खात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास नकार दिला. याहून धक्कादायक बाब म्हणजे रात्री उशिरापर्यंत अंबरनाथ नगरपालिके वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैकी कुणालाही इतक्या गंभीर घटनेची साधी माहिती सुद्धा देण्यात आली नव्हती.