रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

By जितेंद्र कालेकर | Published: August 13, 2023 08:05 PM2023-08-13T20:05:00+5:302023-08-13T20:05:24+5:30

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली.

After the death of the patients, the political organization aggressively surrounds the superintendent with superiors, Thane | रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

googlenewsNext

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असून अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आव्हाड यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये आव्हाड यांच्यासह भाजपा आमदार निरंजन डावखरे, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले आदींचा समावेश हाेता. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात डाॅ. बाराेट यांच्या केबिनमध्ये गोंधळ उडाला होता. या मृत्यूंसाठी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. रुग्णालयात येण्यासाठी मोठे दरवाजे आहेत, पण बाहेर येण्यासाठी दरवाजा नाही, असा आरोपही आव्हाड यांनी केला. येथे पॅथॉलॉजी लॅब नाही. संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करून ती जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धरले धारेवर
माणसे मारायची सुपारी घेतली आहे का? रुग्णालय प्रशासनाने ठाणेकरांची माफी मागावी, असा हल्लाबोल मनसेच्या अविनाश जाधव यांनी केला. औषधांचा तुटवडा आहे. स्कॅनिंगही काही वेळा बंद असते. रुग्ण जास्त झाले, तर मग तसा फलक का नाही लावला? तसे पत्रच मुख्यमंत्र्यांना द्यायला हवे होते, असा पवित्रा केदार दिघे यांनी घेतला. २४ तास शवविच्छेदन सेवा सुरू राहावी, असा ठराव महासभेत झाला, त्याचे काय झाले? असा सवालही यावेळी भाजपच्या संजय वाघुले यांनी केला. नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.

खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधावा : डावखरे
रुग्णांचे मृत्यू चिंताजनक आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णांवर उपचार करावेत, अशी सूचना आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका प्रशासनाला केली. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची विचारपूस करून डावखरे यांच्यासह राजकीय नेत्यांनी त्यांना धीर दिला. या रुग्णालयाला किती डाॅक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, असा सवाल आव्हाड आणि डावखरे यांनी केला. काेराेना काळातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना गरज पडल्यास पुन्हा घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करावी : घाडीगावकर
शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कळवा रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती आणि इतर सामग्रीसाठी पाच वर्षांत देयक काढले आहे, हे पाहता महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.
 

Web Title: After the death of the patients, the political organization aggressively surrounds the superintendent with superiors, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.