उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
By सदानंद नाईक | Published: September 20, 2024 10:59 PM2024-09-20T22:59:06+5:302024-09-20T23:02:07+5:30
आयुक्त विकास ढाकणे यांनी उपोषणाची दखल घेऊन शिष्टमंडळासोबत चर्चा केली.
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण आयुक्त विकास ढाकणे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले. मात्र यावर सोमवारी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती आयुक्त ढाकणे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तनंतर मिळणारे विविध लाभ व सेवावेतन नियमित मिळत नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. पाठपुराव्यानंतरही महापालिका प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गुरवारी पासून लाक्षणिक उपोषण सुरू केले. अखेर आयुक्त विकास ढाकणे यांनी उपोषणाची दखल घेऊन शिष्टमंडळासोबत चर्चां केली.
सेवानिवृत्त कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी असल्याने, त्यांच्या समस्या सोडविणे क्रमप्राप्त असल्याचे आयुक्त म्हणाले. आयुक्तां सोबत झालेल्या चर्चेनंतर समाधान झाल्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र सोमवारी कर्मचाऱ्या सोबत सविस्तर चर्चा करून समस्या एकून घेणार असल्याचे आयुक्त म्हणाले.
आमदार कुमार आयलानी यांनीही आयुक्त विकास ढाकणे यांच्या सोबत चर्चा करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा तोडगा काढण्याची मागणी केली. कायद्याने वागा संस्थने राज असरोडकर व प्रहारचे स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण केले. आयुक्त विकास ढाकणे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.