भिवंडीत प्रभाग अधिकारी निलंबनानंतर अनधिकृत बांधकामावर कारवाईला वेग
By नितीन पंडित | Published: September 26, 2022 06:13 PM2022-09-26T18:13:03+5:302022-09-26T18:13:50+5:30
प्रभाग अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भिवंडीत अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग आला आहे.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात कुचराई केल्या प्रकरणी भिवंडी महानगरपालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शुक्रवारी प्रभाग अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भिवंडीत अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग आला आहे .
प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत चाविंद्रा येथील घर क्रमांक ४२४/० च्या मालकाने या मालमत्तेचे स्ट्रक्चरल ॲाडीट सादर करून मनपा कडुन ईमारत दुरूस्ती करणेकामी परवानगी घेतली.त्याचा गैरफायदा घेत घरमालकाने तेथील यंत्रमाग कारखान्याचे जुने बांधकाम तोडुन त्या ठीकाणी शनिवार,रविवार या सुट्टीच्या दिवसांचा फायदा उठवीत नवीन स्वरूपाचे अनधिकृत विट बांधकाम केले.या बांधकामावर प्रभाग समिती क्रमांक एक चे प्रभाग अधिकारी दिलीप खाने यांनी पालिका रोड कामगारांमार्फत निष्काशन कारवाई करून बांधकाम तोडून टाकले आहे.
शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नये, तसेच नागरिकांनी देखील अशा अनधिकृत बांधकामात मालमत्ता खरेदी करू नयेत असे आवाहन पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नागरिकांना केले आहे. तर अति धोकादायक म्हणून ज्या मालमत्ता जाहीर केल्या आहेत त्याचा कोणत्याही प्रकारे वापर करू नये असे आवाहन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी केले आहे.