बदलीनंतर अधिकाऱ्यांच्या दालनातील सीसीटीव्ही बंद
By admin | Published: May 26, 2017 12:03 AM2017-05-26T00:03:36+5:302017-05-26T00:03:36+5:30
महापालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक होण्यासाठी तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मुख्यालयासह अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक होण्यासाठी तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मुख्यालयासह अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र त्यांची बदली होताच बहुतांश अधिकाऱ्यांच्या केबिनमधील कॅमेरे बंद झाले. अथवा त्यांची तोंडे छताकडे फिरविली आहेत. याप्रकाराबाबात आयुक्त सुधाकर शिंदे यांनी नाराजी व्यक्तकरत कारवाई संकेत दिले आहे.
उल्हासनगर महापालिका विभागातील सावळागोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी व स्वच्छ पारदर्शक कारभार होण्यासाठी निंबाळकर यांनी मुख्यालय परिसरासह अधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. आयुक्तांच्या दालनात याचे नियत्रंण ठेवल्याने त्यांना कोणत्या दालनात काय काम सुरू आहे याचे थेट चित्र दिसत होते. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामाच्यावेळी लिपीक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावत अर्धा दिवसाचे वेतन कापले होते.
आयुक्त निंबाळकर यांची पनवेल महापालिकेत बदली होताच, बहुतांश अधिकारी यांनी दालनामधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. अथवा त्यांची तोंड छताकडे वळवली. त्यामुळे दालनातील काहीही चित्रीत होत नाही. पालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून स्वच्छ व पारदर्शक कारभाराला फाटा दिल्याची टीका होत आहे. अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, मुख्य लेखाअधिकारी दादा पाटील, शहर अभियंता राम जैस्वाल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शितलानी, जनसंपर्क अधिकारी कार्यालय यांच्यासह अनेक कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अथवा त्यांची तोंड छताकडे वळवली आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी दंबंगगिरीचा वापर करत सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे उघड झाले. ज्या अधिकाऱ्यांच्य दालनातील कॅमेरे बंद आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. तत्कालिन आयुक्तांच्या निर्णयाला हरताळ फासल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने महासभा, स्थायी समिती सभागृह, महापौर, उपमहापौर यांच्यासह गटनेता, विरोधीपक्ष नेत्यांच्या दालनातही कॅमेरे बसवण्याची मागणी केली जात आहे.