तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची मीरा-भाईंदर महापालिकेची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 08:48 PM2017-11-05T20:48:23+5:302017-11-05T20:49:01+5:30
मीरा रोड - जेमतेम हजार चौ.फु.च्या तुटपुंज्या जागेतून नया नगर पोलीस ठाण्याचा रामरगाडा हाकला जात असताना आता तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. प्रभाग
मीरा रोड - जेमतेम हजार चौ.फु.च्या तुटपुंज्या जागेतून नया नगर पोलीस ठाण्याचा रामरगाडा हाकला जात असताना आता तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. प्रभाग कार्यालयासमोरील क्षयरोग केंद्राची सुमारे साडेचार हजार चौ.फुट जागा नया नगर पोलीस ठाण्यासाठी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी महासभेस सादर केलाय. विशेष म्हणजे सद्याचे पोलीस ठाणे रस्ता रुंदीकरणाने बाधित असल्याने तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्याचे प्रस्तावात म्हटल्याने पोलीस दलात चलबिचल सुरू झाली आहे.
मीरा रोड पोलीस ठाण्याची मोठी हद्द व लोकसंख्या पाहता मार्च 2014मध्ये मीरा रोड पूर्व भागासाठी नया नगर पोलीस ठाणे मंजूर झाले. परंतु पोलीस ठाण्यासाठी महापालिका जागा देत नसल्याने अखेर जुलै 2015मध्ये नया नगर पोलीस चौकीच्या जागेतच नवे नया नगर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. अत्यंत तुटपुंजी जागा असल्याने जणू काही खुराड्यातूनच पोलीस ठाण्याचा कारभार चालला आहे.
पोलीस ठाण्याला लॉकअप नाही, महिला व पुरुष पोलीसांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाही, महिला पोलीसांना कपडे बदलण्याची सोय नाही, विश्रांती कक्ष नाही. दाटीवाटीने बवनलेल्या छोट्या केबिन, पत्र्याच्या शेड खाली ठाणे अमलदारचा कारभार, वाहनं ठेवायला नसलेली जागा त्यातच अनेक विभाग हे अन्य चौक्यांमध्ये हलवण्यात आले आहेत.
अशा खुराड्यात पोलीस ठाण्याचा कारभार चालला असताना पालिके कडे सातत्याने पोलीस ठाण्यासाठी जागा मागून देखील टोलवाटोलवी चालली होती. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा चालवला होता. अखेर महापालिकेने आता त्यांच्या रसाझ प्रभाग कार्यालया समोर रसाझ एनक्लेव्ह इमारतीत असलेली शहर क्षयरोग निवारण केंद्राची तळ अधिक पहिल्या मजल्याची जागा पोलीस ठाण्यासाठी देण्यास तयारी दाखवली आहे.
सदर क्षयरोग निवारण केंद्र हे निवासी भागात असल्याने रहिवाशांचा आधी पासुनच यास विरोध आहे. त्यामुळे सदर केंद्र हे रामदेव पार्क येथील आरक्षण क्र. २३२ च्या जागेत हलवण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी तसा प्रस्ताव दिलाय. सद्याचे नया नगर पोलीस ठाणे हे रस्ता रुंदीकरणाने बाधीत होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरुपात करण्याचे आयुक्तांनी म्हटल्याने पोलिसांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.