समाज कल्याण विभाग : दोन वर्षांनंतर निधी मिळताच 280 लाभार्थ्यांना झाला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 12:42 AM2020-12-08T00:42:15+5:302020-12-08T00:42:48+5:30
Thane News : जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट, २००४ मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. या योजनेत देण्यात येणाऱ्या रकमेपैकी अर्धी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतविण्यात येत होती, तर उर्वरित रकमेचे संसारोपयोगी साहित्य दिले जात होते.
ठाणे : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्यावतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांंना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेतील केंद्र सरकारच्या हिश्शाची अनुदानाची रक्कम गेली दोन वर्षे प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले होते. मात्र, मागील महिन्यात केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्याने सप्टेंबर, २०१९ पर्यंतच्या २८० लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली.
जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट, २००४ मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. या योजनेत देण्यात येणाऱ्या रकमेपैकी अर्धी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतविण्यात येत होती, तर उर्वरित रकमेचे संसारोपयोगी साहित्य दिले जात होते. वाढती महागाई आणि बदलत्या काळानुसार १५ हजार रुपयांची अनुदानाची रक्कम अत्यंत कमी असल्याने, यामध्ये वाढ करून ५० हजार करण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाह योजना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. २०१५-२०१६ या कालवधीत आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत तब्बल १९२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १९० लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये २१ लाभार्थ्यांना १५ हजार रुपयाप्रमाणे, तर १६९ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. २०१६-२०१७ या कालवधीत विवाह योजनेंतर्गत प्राप्त १३७ प्रस्तावांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. २०१७-२०१८ या कालवधीत २११ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी २०५ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांप्रमाणे, तर सहा लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले.