दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर; 'पंतप्रधानांची माफी मागा,' भाजपची मागणी
By जितेंद्र कालेकर | Published: November 13, 2022 03:21 PM2022-11-13T15:21:44+5:302022-11-13T15:25:08+5:30
वाचा नक्की का होतोय त्यांच्या प्रवेशाला विरोध.
ठाणे : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करण्यास ठाण्यातील भाजपच्या महिला मोर्चाने तीव्र विरोध दर्शविला आहे. दीपाली यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने भाजप महिला मोर्चाने त्यांच्या शिंदे गटातील या प्रवेशाला विरोध केला आहे.
अभिनेत्री दीपाली या ठाकरे गटातून रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेम्भी नाका येथील आनंद आश्रमात शिंदे गटात प्रवेश करणार होत्या. दीपाली सय्यद आणि इतर पक्षातील काही पदाधिकारी देखील प्रवेश करणार आहेत. मात्र सय्यद यांचा प्रवेश तूर्त होणार नसून त्यांचा प्रवेश सोमवारी होण्याची शक्यता आहे.
सय्यद यांच्या प्रवेशाला ठाण्यातील भाजपच्या महिला मोर्चाने विरोध दर्शविला आहे. त्यांची योग्यता नसून ठाकरे गटात असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आधी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली आहे.