Jitendra Awhad : … आता सहाय्यक आयुक्तांच्या दालनातील व्हिडीओ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी केलं ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:04 PM2023-02-15T23:04:45+5:302023-02-15T23:05:31+5:30
यापूर्वी ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाली होती. सहाय्यक आयुक्तांनीही दिली प्रतिक्रिया.
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. या क्लिपनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संध्याकाळी सुमारास महापालिका मुख्यालयाजवळ आहेर यांना मारहाण केली.
दरम्यान, आता यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच “महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमाखर्च सांभाळणारे म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत,” असा दावा त्यांनी या व्हिडीओद्वारे केलाय.
महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे श्री. म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 15, 2023
@ThaneCityPolice @TMCaTweetAway
@Dev_Fadnavis pic.twitter.com/GZHcUH82VK
आहेर यांना मारहाण
ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाल्यानंतर पालिकेच्या आवारात आहेर यांना काही आव्हाड समर्थकांनी मारहाण केली. या घटनेनंतर आहेर यांना पोलीस संरक्षणामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण व्हायरल झाले. या संभाषणात आहेर यांनी आव्हाड यांचा उल्लेख ‘साप’असा केला असून, त्यांना ठेचण्याची भाषा केली आहे. या क्लिपमध्ये आहेर यांचे पोलीस संरक्षण काढले तेव्हा त्याच रात्री पावणेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी सहपोलिस आयुक्तांना फोन करून आहेर यांच्या जिवाला आव्हाड यांच्यापासून धोका असल्याचे सांगितल्याचे खुद्द आहेर यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर यांना सांगून आव्हाड यांचे कुटुंब व त्यांना संपविण्याकरिता मोठी रक्कम मोजल्याचा उल्लेख केलेला आहे. ठाकूर व आहेर यांच्या व्यावहारिक संबंधांचीही या कथित क्लिपमध्ये चर्चा असल्याचे समजते.
चार जण ताब्यात
ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केलेल्या महाराणी संदर्भात नौपाडा पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील चौकशी सुरू आहे.
काय म्हणाले आहेर?
“मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही. त्यात आवाज कुणाचा आहे हे सांगता येणार नाही. ५ जानेवारीला मी गुन्हेगाराबद्दल एक पेन ड्राईव्ह देऊन एक एफआयआर दाखल केला होता. ज्यात माझ्या हत्येची सुपारी त्यांनी घेतल्याचं आहे. तो त्यात क्लिअर म्हणतोय की मी आव्हाड साहेबांशी बोललोय, महेश को मार, मैने उसका इंतजाम किया है. यानंतर त्या व्यक्तीला अटक झाली आहे,” अशी प्रतिक्रिया आहेर यांनी दिली. “मी सहाय्यक आयुक्त असल्यापासून अनधिकृत बांधकामं तोडली होती. त्यानंतर वारंवार माझ्यावर दडपण टाकण्यात आलं होतं. दारु पिऊन मला व्हॉट्सॲप कॉल, वेगवेगळ्या नंबरवरून फोन केले जायचे, शिव्या दिल्या होत्या. मी तुम्हाला जी ऑडिओ क्लिप देतोय त्यात क्लिअर ऐकू येतंय मी आव्हाड साहेबांसोबत बोललो आहे. मी महेशला मारून टाके. पोलिसांनी त्या व्यक्तीवर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातून हे प्रकार घडले आहेत,” असेही ते म्हणाले.