पुन्हा बेकायदा बांधकामांचे पेव
By admin | Published: March 22, 2016 02:11 AM2016-03-22T02:11:34+5:302016-03-22T02:11:34+5:30
उल्हासनगर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला होता. त्या वेळी नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले होते. पण, गेल्या काही दिवसांत भूमाफियांनी खुल्या जागा
उल्हासनगर : उल्हासनगर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला होता. त्या वेळी नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले होते. पण, गेल्या काही दिवसांत भूमाफियांनी खुल्या जागा, आरक्षित भूखंडांवर बेकायदा बांधकामांना सुरुवात केली
असून अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने सर्वसामान्य प्रशासनाच्या नावाने बोटे मोडू लागले आहेत.
उल्हासनगरातील बहुतांश आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. जे शिल्लक आहेत, त्यावर दिवसाढवळ्या बेकायदा बांधकामे होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी उपायुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी १५ दिवसांत ४० पेक्षा जास्त व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करून भूमाफियांचे कंबरडे मोडले होते. अतिक्रमण विभाग असाच आक्रमक राहिल्यास बांधकामाला आळा बसेल, असे बोलले जात होते. नागरिकांनी रांगा लावून आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले. मात्र, या विश्वासाला काही दिवसांत तडा गेल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
शहरातील महादेव कम्पाउंड, राणा खदाण, डम्प्ािंग ग्राउंड, प्रभाग समिती-२ च्या कार्यालयामागे, तहसील कार्यालय परिसर येथे बेकायदा बांधकामे झाली आहेत. प्रभाग अधिकारी भगवान कुमावत, अजित गोवारी, नंदलाल समतानी यांनी बांधकामांना नोटिसा दिल्या. मात्र, कारवाई होत नसल्याने नागरिकांचा पालिका प्रशासनावरील विश्वास
उडत चालला आहे. बेकायदा बांधकामाला प्रभाग अधिकारी यांच्यासह मुकादम, स्थानिक अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांना जबाबदार धरले होते. मात्र, पालिकेची कारवाई शून्य आहे.
कॅम्प नं-५ परिसरातील गाऊन मार्केटमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली असंख्य बांधकामे उभी राहिली. पालिकेने पोलीस संरक्षणात कारवाई केली. मात्र, काही महिन्यांत अधिकारी व स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादाने बांधकामे उभी राहिली. पाडकाम केलेली ९० टक्के बांधकामे पालिकेच्या नाकावर टिच्चून उभी राहिली आहेत. यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात असून नगरसेवक, त्यांचे नातेवाईक, पक्ष पदाधिकारीच बेकयदा बांधकामे करत आहेत.