ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:52 AM2019-11-28T01:52:14+5:302019-11-28T01:52:42+5:30

ठाणेकरांसाठी सुखकर प्रवासी हमी न देता जुन्याच योजनांचा मुलामा देऊन ठाणे परिवहन सेवेने फेब्रुवारी महिन्यात मूळ अंदाजपत्रक सादर केले होते.

Again, the hike of ticket price hike on Thanekar | ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढीची कुऱ्हाड

ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढीची कुऱ्हाड

Next

ठाणे : ठाणेकरांसाठी सुखकर प्रवासी हमी न देता जुन्याच योजनांचा मुलामा देऊन ठाणे परिवहन सेवेने फेब्रुवारी महिन्यात मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. यावेळी प्रस्तावित केलेली २० टक्के तिकीट दरवाढ परिवहन समितीने फेटाळली होती. परंतु, यानंतर ठाणेकरांवर पुन्हा तिकीट दरवाढीचे संकट ओढावले आहे. परिवहन समितीने ही दरवाढ फेटाळली असली तरी येत्या महासभेत तिकीट दरवाढीचा हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे, तशा हालचाली आता सुरू झाल्या आहेत.

ठाणे परिवहन सेवेमार्फत फेब्रुवारी महिन्यात परिवहन समितीसमोर २०१८-१९ चे २५१.०३ कोटी आणि सन २०१९-२० चे ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात ठाणेकरांवर सहाव्यांदा तिकीट दरवाढ लादण्यासंदर्भात सूचित केले होते. ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० बस असल्या तरीदेखील रस्त्यावर टीएमटीच्या स्वत:च्या ८० च्या आसपास तर जीसीसीच्या माध्यमातून १९० आणि एसी २५ अशा एकूण २९५ च्या बस धावत आहेत. त्यातून अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असून परिवहनचे उत्पन्न हे ३० लाखांच्या घरात आहे.

ठाणेकरांना आजही सुखकर प्रवासी हमी परिवहन प्रशासनाने दिलेली नाही. असे असताना सहाव्यांदा परिवहनने ही २० टक्के तिकीट दरवाढ सुचविली आहे. चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजी दरात झालेली लक्षणीय वाढ, परिवहन सेवेच्या संचलनात असलेल्या जुन्या बस यामुळे डिझेलचा होणारा जास्त वापर तसेच शासनाने कार्यान्वित केलेल्या जीएसटीमुळे वाहनांचे सुटे भाग खरेदी किमतीत झालेली दरवाढ यासह धक्कादायक म्हणजे सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे कारणही परिवहन प्रशासनाने भाडेवाढीसाठी पुढे केले आहे.

या सर्व बाबींमुळे परिवहन सेवेच्या दैनंदिन महसुली तुटीमध्ये वाढ होत आहे. ती भरून काढण्यासाठी इतर उत्पन्नाच्या स्रोतांबरोबर भाडेवाढ ही प्रस्तावित केली असल्याचे परिवहनने स्पष्ट केले होते. परिवहनच्या तिकीटदरात २० टक्के भाडेवाढ याप्रमाणे दैनंदिन ३.४० लाख यानुसार संभाव्य भाडेवाढ अपेक्षित रक्कम ९ कोटी ३५ लाख अपेक्षित धरली आहे. त्यानुसार प्रवासी उत्पन्नापोटी १६३.७४ कोटींची जमा अपेक्षित धरण्यात आली होती.

परिवहन समितीने हा दरवाढीचा प्रस्ताव निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फेटाळला होता. त्यानंतर परिवहन प्रशासनाने मात्र परिवहन समितीला केराची टोपली दाखवून तो नव्याने महासभेत मंजुरीसाठी ठेवण्याचे प्रयोजन केले आहे. परंतु, समितीने फेटाळलेला प्रस्ताव महासभा मंजूर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सहाव्यांदा होणार भाडेवाढ

यापूर्वी १ जानेवारी २००३, ११ आॅगस्ट २००७, १६ जून २०११ आणि मार्च २०१३ मध्ये भाडेवाढ झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पाचव्यांदा भाडेवाढ केली होती. त्यानंतर आता २०१९ मध्ये सहाव्यांदा भाडेवाढ प्रस्तावित केली आहे.

एकीकडे मुंबईत शिवसेनेच्या माध्यमातून बेस्टचे तिकीट हे पाच रुपये करण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्यातही तशा प्रकारच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. मात्र, असे असताना प्रशासनाकडून हा दरवाढीचा प्रस्ताव पुढे रेटला जात असल्याने त्याला सत्ताधारी शिवसेना कशा पद्धतीने सामोरे जाते, याकडे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Again, the hike of ticket price hike on Thanekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.