पुन्हा महापौर विरुद्ध आयुक्त; हवी तेव्हा महासभा घेईन, मीनाक्षी शिंदेंचे जशास तसे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 03:15 AM2018-03-25T03:15:18+5:302018-03-25T03:15:18+5:30
महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरून आगपाखड केल्याने त्याचा राग मनात धरून अधिकाऱ्यांनी महासभेलाच दांडी मारली होती. यावेळी केवळ ३५ (अ) चे विषय मंजूर करण्यात आले होते. परंतु, आता हे विषयदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ठाणे : महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरून आगपाखड केल्याने त्याचा राग मनात धरून अधिकाऱ्यांनी महासभेलाच दांडी मारली होती. यावेळी केवळ ३५ (अ) चे विषय मंजूर करण्यात आले होते. परंतु, आता हे विषयदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. अधिका-यांनी अशा पद्धतीने असहकार पुकारल्याने आता महापौरांनीदेखील अधिका-यांवर पलटवार केला असून मला हवी तेव्हा मी महासभा लावेन, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे महापौर विरुद्ध आयुक्त यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे.
मंगळवारी महासभा सुरू झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरांच्याच तासामुळे लांबली. त्यामुळे सभा तहकूब करून बुधवारी पुन्हा ती लावण्यात आली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरिक्त एकही अधिकारी तिला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे सभा काही काळासाठी तहकूब केली. विशेष म्हणजे एकीकडे महासभा सुरू असतानाच दुसरीकडे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिसर्च सेंटर येथे सर्व अधिकाºयांची आढावा बैठक लावली. ती संपल्यानंतर अधिकारी सभेसाठी येतील, अशी नगरसेवक आणि पदाधिकाºयांची भावना होती. मात्र, मार्चअखेरच्या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यस्त असून काही अधिकारी विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत, अशी सबब प्रशासनानेदिली. त्यामुळे सभेसाठी अधिकारी येणार नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यानंतर, तहकूब सभा पुन्हा सुरू झाली. मार्चपूर्वी आर्थिक बाबींचे प्रस्ताव मंजूर झाले नाही, तर निधी लॅप्स होण्याची भीती असल्याने ३५ (अ) अन्वये सादर केलेल्या प्रस्तावांना सभागृहाने मंजुरी दिली. त्यानंतर, गैरहजर अधिकाºयांचा साधा निषेधही नोंदवण्याची हिम्मत न दाखवता सभा पुन्हा पूर्ण वेळेसाठी तहकूब करण्यात आली. परंतु, महापौरांनी केलेल्या टीकेमुळेच ते महासभेला गैरहजर राहिल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.
दरम्यान, पालिका सचिवांनी पुढील आठवड्यात महासभा लावावी, अशी मागणी महापौरांकडे केली आहे. परंतु, आता महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेऊन महासभा न लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून वारंवार होत असलेल्या चुकांचे समर्थन का करायचे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता तहकूब महासभा होणार की नाही, याबाबत मात्र कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, यानिमित्ताने आता महापौर आणि आयुक्त पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले असून त्यांच्यामध्ये आता शीतयुद्ध रंगू लागले आहे.
यापूर्वीदेखील महापौर आणि आयुक्त यांच्यात महासभेत अनेक वेळा वाद झाले होते. त्यामुळे प्रशासन विरुद्ध सत्ताधारी असादेखील संघर्ष निर्माण झाला होता. यामुळे महापौर आणि आयुक्त यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली होती. परंतु, आता रेंटलच्या घराच्या मुद्यावरून पुन्हा महापौर आणि आयुक्तांमध्ये ठिणगी पडली आहे.
पालकमंत्री काय करणार?
महासभेला दांडी मारणाºया अधिकाºयांना वठणीवर आणण्यासाठी आता माघार नाही, असा पवित्राच महापौरांनी घेतला आहे.
पालकमंत्री महापौरांच्या नाराजीची दखल घेणार की आयुक्तांच्या बाजूने, उभे राहणार याचे औत्सुक्य आहे.