पुन्हा राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पुसली पाने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 07:42 PM2017-10-25T19:42:18+5:302017-10-25T19:43:28+5:30
शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे
भिवंडी : शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षापासून मेट्रो रेल्वे भिवंडीत येणार असे सांगत राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले असुन विकासकांसाठी ही रेल्वे शहराबाहेर वळविल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मंत्री भाऊसाहेब वर्तक व खासदार भाऊसाहेब धामणकर यांनी ठाणे ते डहाणू रेल्वे भिवंडी शहरातून नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता.परंतू केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला गती मिळाली नाही.त्यानंतर शहरातील कापड उद्योगाला गती मिळावी या करीता दिवा-वसईरोड दरम्यान भिवंडी रोड रेल्वेस्थानक सुरू करून या रेल्वेमार्गावर प्रवासी वहातूकीपेक्षा मालगाडी वहातूकीस जास्त प्राधान्य देण्यात आले.देशांमधील प्रत्येक राज्यातून आलेला व्यक्ती शहरात कापड व्यावसायीक अथवा कामगार म्हणून काम करीत आहे.गेल्या काही वर्षापासून येथील ग्रामिण भागात झालेल्या गोदामांत देखील मोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाला आहे.असे असताना त्यांच्या प्रवासी सेवेसाठी राज्यकर्ते नेहमी उदासीन असल्याचे दिसुन आले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ ही रेल्वे कापुरबावडी-अंजूरफाटा ते गोपाळनगर नंतर पुढे कल्याण येथे जाणार होती.आता ही रेल्वे अंजूरफाटा येथुन ओसवालवाडी ताडालीमार्गे गणेशनगर-टेमघर अशी मुळ शहराबाहेरून पुढे कल्याण येथे जाणार असल्याने शहरातील लोकांना त्याचा फारसा काही उपयोग न होता त्यांच्या भिवंडीकरांच्या नशीबी सध्या असलेला त्रास कायम रहाणार आहे.पुर्वी भिवंडीरोड रेल्वेसाठी अंजूरफाटा गाठावा लागायचा आता मेट्रोसाठी तेथे जावे लागणार आहे.त्या ऐवजी अनेकांना सध्या सुरू असलेल्या खाजगी व सार्वजनिक प्रवासी सेवा उपयुक्त ठरणार आहे.म्हणजेच भिवंडीकरांना ही मेट्रो उपयुक्त न ठरता पुन्हा वहातूक कोंडीतून जावे लागणार आहे.गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक राजकारण्यांनी धामणकरनाका,गोपाळनगर पर्यंत मेट्रो येऊन नागरिकांची वहातूक कोंडीपासून सुटका झाल्याच्या वावड्या उठविल्या होत्या त्याला मेट्रोच्या नवीन जाहिर झालेल्या मार्गाने पुर्णविराम मिळाला असुन राजकारण्यांचा खरा चेहरा नागरिकांसमोर आला आहे.