कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विरोधात 'सेवा नाही तर कर नाही’ लाक्षणिक मूक धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 04:14 PM2017-10-02T16:14:55+5:302017-10-02T16:15:05+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले.
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. एक तास मूक धरणे आंदोलन करून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीतील नागरिक महापालिकेच्या सेवा न पुरविण्याच्या वृत्तीच्या विरोधात एकवटले आहे. त्यासाठी नागरिकांनी बैठका घेतल्या. तसेच महापालिका मुख्यालयात आयुक्तांनी भेट नाकारल्याप्रकरणी ठिय्या आंदोलन केले. मात्र सेवा नाही तर कर नाही ही आंदोलनाची टॅगलाइन ठरविण्यात आली आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेत 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महापालिका प्रशासनास दिला होता. त्यानुसार आज सकाळी शंकरराव चौकात एक तासाचे मूक धरणे देण्यात आले. या मूक धरणे आंदोलनात घाणेकर यांच्यासह माजी नगरसेवक इफ्तेखार खान, उमेश बोरगावकर, उमंग सामाजिक संस्थेचे गफ्फार शेख, काँग्रेस महिला आघाडीच्या कांचन कुलकर्णी, जागरुक नागरिक शैलेंद्र नेहरे, शैलेश जोशी, मदन शंकलेषा, संदीप देसाई आदी सहभागी झाले होते.
घाणेकर यांनी सांगितले की, सेवा नाही तर कर नाही या आंदोलनास आजपासून सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयापासून लोकग्रामपर्यंत मेणबत्ती घेऊन कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. कर भरणा-या नागरिकांना महापालिकेकडून सेवा पुरविल्या जात नसल्याने आयुक्तांना भेटीची वेळ मागितली होती. आयुक्तांनी भेटीची वेळ दिली नाही. तेव्हा ठिय्या आंदोलन केले. त्यावर आयुक्तांनी 29 सप्टेंबर रोजी भेटीची वेळ दिली होती. पुन्हा त्यांना काही काम आल्याने त्यांना 29 सप्टेंबरच्या तारखेला भेटता आले नाही. नव्याने 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता आयुक्त आंदोलनाविषयी चर्चेसाठी भेटणार आहेत. आज गांधी जयंती दिनाची सुट्टी असल्याने निवेदन देण्याचा विषय आज नव्हताच असे घाणोकर यांनी स्पष्ट केले.