आगरी बांधवांचा शिक्षक दिन सोहळ्यात काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:45 AM2021-09-06T04:45:01+5:302021-09-06T04:45:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : शिक्षक दिनानिमित्त मुरबाड येथे तालुका स्तरावर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी झाला. या सोहळ्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : शिक्षक दिनानिमित्त मुरबाड येथे तालुका स्तरावर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी झाला. या सोहळ्याच्या पुरस्कार प्रक्रियेत आगरी समाजाला प्राधान्य न दिल्याने संतप्त शिक्षक काळ्या फिती लावून उपस्थित होते. त्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.
मुरबाड पंचायत समितीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सन २०१९-२० मध्ये शिक्षकांच्या ३४ फाईल मागविल्या होत्या. त्यातून त्यांनी ११ शिक्षकांची निवड केली व २०२०-२१ साठी १५ फाईल मागविल्या. त्यापैकी ११ अशा २२ शिक्षकांना तालुका स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले होते. त्यांचे वितरण रविवारी कुणबी समाज सभागृह येथे होते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सभापती दीपक पवार, उपसभापती स्नेहा धनगर यावेळी उपस्थित होते. कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने आगरी बांधवांमध्ये उत्साह होता. मात्र, पुरस्कारास पात्र असणाऱ्या तसेच आगरी समाजातील शिक्षकांना पुरस्कारातून डावलल्याने संतप्त शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध दर्शवला. तर १५ वर्षांच्या सेवेनंतर बहुतांश शिक्षकांना तालुका स्तरावरील पुरस्कार दिला जातो. मात्र, येथील शोभना सराफ या शिक्षिकेला ३३ वर्षांच्या सेवेनंतर पुरस्कार दिला गेला, त्याचीही तालुक्यात चर्चा झाली. ‘सालाबादप्रमाणे शिक्षणविभाग शिक्षकांचा केवळ सन्मान पत्र देऊन गौरव करते. तर यापुढे शिक्षकांना पुरस्कार म्हणून रोख रक्कम देण्यासाठी विशेष तरतूद केली जाईल’, असे आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिले.
------------
मुरबाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. व्ही. लंबाते यांच्या कार्यशैलीवर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
येथे अनेक वर्षे गट शिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारी गट शिक्षणाधिकारी हे कारभार सांभाळत आहेत. तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला आलेली मरगळ हटविण्यासाठी रिक्त पद भरावे, अशी विनंती माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली.
--------