आगरी महोत्सव समाजाभिमुख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:28 AM2018-11-25T00:28:40+5:302018-11-25T00:28:51+5:30

काळू कोमास्कर यांचा आरोप : हिशेबही दिला नाही, आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह

Agari Mahotsav is not socially oriented | आगरी महोत्सव समाजाभिमुख नाही

आगरी महोत्सव समाजाभिमुख नाही

Next

कल्याण : आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील क्रीडासंकुलात १५ वर्षांपासून आगरी महोत्सव भरवण्यात येत आहे. मात्र, हा महोत्सव समाजाभिमुख नाही. या महोत्सवाच्या नावाखाली गोळा करण्यात येणाऱ्या पैशांचा हिशेबही दिला जात नाही, असा मुद्दा आगरी समाजाचे व डोंबिवली लालबावटा रिक्षा युनियनचे प्रमुख काळू कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे. कोमास्कर यांनी याविषयी मंगळवार, २७ नोव्हेंबरला समाजबांधवांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, या आरोपामुळे आगरी महोत्सवाच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


घरगुती उत्पादनांना बाजारपेठ, समाज-संस्कृतीचे संवर्धन, वैचारिक व्यासपीठ देणे, या उद्देशाने आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाला सुरुवात केली. महोत्सवासाठी विशेषत: त्यात सहभागी होणाºया व्यावसायिक स्टॉल्सकडून भाडे आकारले जाते. परंतु, महोत्सवासाठी समाजाने दिलेल्या निधीचा उपयोग हा समाजासाठीच झाला पाहिजे. हा पैसा आयोजन संस्थेचा नसून तो समाजाचा आहे. या निधीचा १५ वर्षांत हिशेब दिला गेलेला नाही, असा मुद्दा कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे.


आगरी महोत्सव समाजाभिमुख असायला हवा. एखादी व्यक्ती अथवा संस्थेचा नसावा, याकडे कोमास्कर यांनी लक्ष वेधले आहे. आगरी समाजाचे नाव घेऊन एखादी व्यक्ती आपले स्वत:चे नाव मोठे करत असेल तसेच एखादी संस्था हा महोत्सव स्वत:ची मक्तेदारी समजत असेल, तर त्याला समाजाचा विरोध आहे, असे सांगून कोमास्कर यांनी आगरी युथ फोरम व त्याचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यावर निशाणा साधला आहे. महोत्सवाच्या समितीत समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जात नाही. वेगवेगळ्या तालुक्यांतील आगरी समाजबांधवांना सामावून घेतले जात नाही, असे मुद्देही कोमास्कर यांनी मांडले आहेत.


दरम्यान, या सर्व मुद्यांवर विचारविनिमय करण्यासाठी निळजे येथील ज्येष्ठ नागरिक भवनात २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान बैठक होणार आहे. यावेळी माजी आमदार, मनसेचे नेते, केडीएमसीचे नगरसेवक, युवा मोर्चासह विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या सगळ्यांची त्यांना कल्पना देऊनच ही बैठक बोलावल्याचे कोमास्कर म्हणाले.


महोत्सवाचे होते लेखापरीक्षण - वझे
आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘आगरी युथ फोरमतर्फे भरवल्या जाणाºया आगरी महोत्सवाच्या जमाखर्चाचे लेखापरीक्षण केले जाते. त्यात, लपवाछपवी होत नाही. एका भाजपा नेत्याच्या पुढाकाराने महोत्सव भरवला जातो. त्याची समाजकार्यास मदत होत आहे. हीच पोटदुखी कोमास्कर यांना आहे. महोत्सव समाजाभिमुख नसल्याचा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच महोत्सव भरवण्यासाठी बैठक घेऊन विविध समाजांतील मान्यवरांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. दरवर्षी अशी बैठक घेतली जाते. चांगले व यशस्वी आयोजन हेच विरोधकांच्या डोळ्यांत खुपत असल्याने त्यांनी विविध निराधार मुद्दे उपस्थित करून आयोजनावर बोट ठेवले आहे. हे चुकीचे आहे.’

 

Web Title: Agari Mahotsav is not socially oriented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.