पारंपरिक पद्धतीनेच ठरवले जाते वृक्षाचे वय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:11 AM2019-06-02T01:11:09+5:302019-06-02T01:11:28+5:30

आधुनिक पद्धतीचा अभाव । ठाण्यात पाच लाख वृक्ष असल्याचा पालिकेचा दावा

The age of the tree is determined by traditional method | पारंपरिक पद्धतीनेच ठरवले जाते वृक्षाचे वय

पारंपरिक पद्धतीनेच ठरवले जाते वृक्षाचे वय

googlenewsNext

अजित मांडके

ठाणे : ठाण्यात शेकडो वर्षे जुने शेकडो वृक्ष असूनही त्यांचे आयुर्मान निश्चित करण्याकरिता पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जात आहे. कार्बन डेटिंग किंवा रेडिओ अ‍ॅक्सिव्ह कार्बन या पद्धतीने वृक्षाचे नेमके वय निश्चित करण्याची पद्धती अवलंबली जात नाही. एखाद्या झाडाचे आयुर्मान ठरवताना ठाणेकर वृक्षप्रेमी व तज्ज्ञ पारंपरिक पद्धतीचा वापर करतात. यामध्ये या वृक्षाचा आकार त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तसेच त्याच्या फांद्या या किती जाड आहेत, त्या जमिनीत किती खोलवर गेल्या आहेत आणि त्या फांद्यांची संख्या किती आहे, यावरून झाडाचे आयुर्मान ठरवले जाते.

कार्बन डेटिंग पद्धतीने मोजता येते वय
वैज्ञानिक दृष्टीने एखाद्या वृक्षाचे आयुर्मान ठरवायचे झाल्यास त्यामध्ये दोन पद्धतीचा अवलंब होऊ शकतो. एका पद्धतीमध्ये वृक्ष हा मृत असावा लागतो. त्यानुसार, त्या वृक्षाच्या खोडाचा आडवा छेद पातळ कापावा लागतो. त्यानंतर, त्या वृक्षाची यावरून वाडचक्र मोजली जातात आणि यावरूनच एखाद्या वृक्षाचे वय समजले जाऊ शकते, अशी माहिती वृक्षतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी दिली. दुसऱ्या पद्धतीमध्ये खोडाच्या मध्यभागातील पेशींचा समूह बाहेर काढावा लागतो. त्यानंतर रेडिओ अ‍ॅक्सिव्ह कार्बनच्या साहाय्याने त्या झाडाचे आयुर्मान निश्चित केले जाऊ शकते. परंतु, ही अत्याधुनिक पद्धत आपल्याकडे वापरली जात नाही. देशातील डेहराडून आणि इतर ठिकाणी याच पद्धतीने जुन्या वृक्षाचे आयुर्मान मोजले जाते.

ठाणे शहरात पाच लाखांहून अधिक वृक्ष
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात आजमितीला पाच लाखांहून अधिक वृक्ष आहेत. सर्वेक्षण करताना वृक्ष किती जुना, याचा अंदाज बांधला जातो व त्याची गणना केली जाते.

येथे आहेत १०० वर्षांपूर्वीचे वृक्ष
शहरातील क्लेरिअंट कंपनी, बाराबंगला, गडकरी रंगायतन, रेमण्ड कंपनी, ग्लॅक्सो, कापूरबावडी पोलीस स्टेशन आदींसह इतर खाजगी जागांमध्ये अशा प्रकारचे शंभरहून अधिक १०० किंवा त्यापेक्षा अधिक आयुर्मान असलेले वृक्ष आहेत. ठाणेकरांचे हे ऐतिहासिक संचित जतन करण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: The age of the tree is determined by traditional method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे