एजंटच्या फसवणूकीने मलेशियात अडकलेल्या भिवंडीतील तरूणाची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:17 AM2018-11-05T01:17:20+5:302018-11-05T01:20:55+5:30

भिवंडी : एजंटने फसवणूक करून नोकरीसाठी मलेशियात पाठविलेल्या शहरातील तरूणाकडे पारपत्र व इतर कागदपत्रे नसल्याने परदेशी प्रशासनाच्या कारवाईत अडकला ...

Agent Fraud Delivering the Bidivandi Struggle in Malaysia | एजंटच्या फसवणूकीने मलेशियात अडकलेल्या भिवंडीतील तरूणाची मुक्तता

एजंटच्या फसवणूकीने मलेशियात अडकलेल्या भिवंडीतील तरूणाची मुक्तता

Next
ठळक मुद्देमलेशियास नोकरीसाठी जाण्यासाठी प्रलोभने दाखविली एजंटनेन्यायालयाने तीन महिने कैद व दोन कोड्यांचे फटक्यांची शिक्षा सुनावलीदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने सुत्रे हलविल्याने जावेदची सुटका

भिवंडी : एजंटने फसवणूक करून नोकरीसाठी मलेशियात पाठविलेल्या शहरातील तरूणाकडे पारपत्र व इतर कागदपत्रे नसल्याने परदेशी प्रशासनाच्या कारवाईत अडकला होता. या प्रकरणी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने लक्ष घालून नुकतीच त्याची मुक्तता केली आहे. या घटनेने पुन्हा फसवणूक करणाऱ्या एजंटचा विषय ऐरणीवर आला आहे.
      जावेद मन्सूरी(२३)असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नांव असुन तो शहरातील चव्हाण कॉलनीत अलअमन सोसायटीच्या इमारतीत आपल्या कुटूंबासह रहात आहे. तो शहरातील टेलरच्या दुकानात टेलरचे काम करीत होता. मात्र शहरातील कापड उद्योगातील मंदीमुळे तो आर्थिक संकटास तोंड देत होता. ही संधी साधत त्याला एका एजंटने मलेशियात बड्या पगाराच्या नोकरीचे आमिष देत विविध प्रलोभने दाखवली. तसेच त्या एजंटने त्याच्याकडून मलेशियात जाण्याचे तिकीट, व्हिसा आदींसाठी एक लाख ७५ हजार रु पये घेतले.या एजंटने परदेशी जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे बनवून जावेदला दिले .मात्र जावेदला मुंबई विमानतळा ऐवजी ओरिसातील भुवनेश्वर विमानतळारून मलेशीयास पाठविण्यात आले. त्यास विमानात बसविण्यापुर्वी विमानतळापासून काही अंतरावर मोबाईलवर शुटींग करून ‘मी स्वत:च्या मर्जीने जात असून, इमानदारीने काम करणार आहे.’असे जावेदकडून वदवून घेण्यात आले. जावेद हा मलेशियात पोचल्यानंतर तेथील एजंटने विमानतळाबाहेर जावेदला गाठून त्याच्याकडून पासपोर्ट व व्हिसाची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्या नंतर तो काही दिवस मलेशियात काम करीत होता. ७ आॅगस्ट २०१८च्या मध्यरात्री तो राहत असलेल्या ठिकाणी मलेशियाच्या पोलिसांनी छापा टाकला आणि जावेदकडे पारपत्रासह इतर कागदपत्रांची मागणी केली. त्याच्याजवळ कागदपत्रे नसल्याने त्याला कागदपत्रे सादर करण्यासाठी चार तासांची मुदत देण्यात आली. या काळात जावेदने ज्या ठिकाणी काम करीत होता त्या कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला पोलीसांनी ८ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यास न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोषी ठरवून त्यास तीन महिने कैद व दोन कोडे (चाबकाचे फटके) मारण्याची शिक्षा दिली. जावेदला दोन कोडे मारल्यानंतर तो तेथे जागीच कोसळला. पुढील १५ दिवस तो उभा राहू शकत नव्हता. तुरूंगात शिक्षा भोगत असताना त्याने शहरातील आपल्या कुटुंबियांशी संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगीतला. तेंव्हा चिंतेत सापडलेल्या त्याच्या कुटुंबियांनी खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्कसाधला. या घटनेची दखल घेत खा. कपिल पाटील यांनी ही घटना केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना सांगितली. त्यानंतर देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मलेशियातील भारतीय विकलातीशी संपर्कसाधून सुत्रे हलविली. तसेच जावेद हा निर्दोष असून त्याची फसवणूक झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जावेदची तातडीने सुटका करण्यात आली.ही कारवाई पंधरा दिवसांत पुर्ण झाली आणि पाच दिवसांपुर्वी जावेद मन्सुरी शहरात चव्हाण कॉलनीतील आपल्या घरी परतला आहे. मन्सूरी कुटुंबांनी जावेद सोबत खासदार कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले.

Web Title: Agent Fraud Delivering the Bidivandi Struggle in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.