कारवाई केल्याच्या रागातून मदत करणाऱ्या पोलिसालाच धक्काबुक्की: मद्यपी चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:10 PM2018-12-03T21:10:07+5:302018-12-03T21:16:07+5:30
मद्यपी दुचाकीस्वार गाडीवरुन पडल्यानंतर त्याला मदत करणा-या पोलिसाचे आभार मानण्याऐवजी त्यालाच मारहाण करुन शिवीगाळ करणा-या बिपीन पाल (२२) या चालकाला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.
ठाणे: दारुच्या नशेत मोटारसायकल चालवितांना खाली पडलेल्या चालकाला मदतीसाठी गेलेल्या बबन खेडकर (३२) या वाहतूक पोलीस शिपायालाच शिवीगाळी करीत धक्काबुक्की करणा-या बिपीन पाल (२२) या चालकाला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या बाळकूम येथील राहणारा बिपीन हा १ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे अग्निशमन दलाच्या कार्यालयाकडून कापूरबावडी सर्कलकडे जाणाºया रस्त्याने मोटारसायकलवरुन जातांना खाली पडला. यात त्याच्या तोंडाला आणि हाताला मार लागून तो रक्तबंभाळ झाला. त्यामुळे तिथे वाहतूक नियमनाचे काम करणारे पोलीस शिपाई खेडकर त्याच्या मदतीसाठी धावून गेले. त्याची मोटारसायकल बाजूला घेत असतांना त्याने ‘मेरे पे केस करता है,’ असे बोलून त्यांच्याच श्रीमुखात लगावली. तो आवाक्याच्या बाहेर जात असल्याचे पाहून खेडकर यांनी इतर पोलीस कर्मचा-यांची मदत घेऊन त्याला कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केले. तिथेही त्याने गोंधळ घालत पोलीस कर्मचा-यांना शिवीगाळ केली. पोलीस ठाण्यातील लोखंडी बाकडाही त्याने आदळला. तसेच महिला पोलीस कर्मचा-यांवरही तो धावून गेला. त्याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा करणे, पोलीस कर्मचा-याला मारहाण करणे, शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली.