सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाविरोधातील आंदोलन सुरूच, तोडगा काढण्यासाठी ‘केडीएमसी’मध्ये धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:41 AM2019-06-29T00:41:14+5:302019-06-29T00:41:18+5:30
कल्याण शहराच्या पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महागडी पुस्तके घेण्याच्या सक्तीविरोधात पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.
कल्याण : शहराच्या पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महागडी पुस्तके घेण्याच्या सक्तीविरोधात पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शाळा बंद राहिल्यामुळे तोडगा काढण्यासाठी पालकांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात धाव घेतली.
पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी संतप्त पालकांनी शाळेच्या गेटला टाळे ठोकल्याचे आंदोलन केले. गुरुवारी काही पालकांसह स्थानिक शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी मुंडण आंदोलन करून व्यवस्थापनाचा निषेध केला. तसेच बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळाने अधिकृत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त दुसरा कोणताही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सक्तीचा करून लादला जाऊ नये, असे आदेश शाळेला दिले होते. या आदेशानंतरही शाळा व्यवस्थापन त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे पालकांनी आधी निवेदन, त्यानंतर घेराव, साखळी उपोषण, बेमुदत उपोषण, टाळे ठोकणे आणि मुंडण आंदोलन केले आहे. यानंतरही काहीच तोडगा निघालेला नाही. काही पालकांना फीवाढ आणि पुस्तकांचा निर्णय मान्य नाही. काही पालकांची याविषयी काहीएक कुरबुर नाही. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे, असे विरोध नसणाºया पालकांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापन, पालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी चर्चा करून तोडगा काढावा, यासाठी काही पालकांनी शुक्रवारी मुख्यालयात धाव घेतली आहे.
नुकसान विद्यार्थ्यांचेच!
पालक विनोद तिवारी म्हणाले की, शाळा व्यवस्थापनाने पुस्तकाची सक्ती न करण्याचे मान्य केले आहे. काही पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनामुळे शाळा तीन दिवस बंद आहेत. यावर तोडगा न निघाल्यास शेवटी विद्यार्थीच भरडले जाऊ न त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.