'निवडणुकीतील व्होटबँकेसाठी दिल्लीत आंदोलन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:56 AM2019-12-23T00:56:14+5:302019-12-23T00:56:47+5:30
माधव भंडारी यांचा आरोप : नोटाबंदीच्या पोटदुखीतूनही नागरिकत्व कायद्याबाबत दिशाभूल
कल्याण : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि येऊ घातलेला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायदा हा अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही. तो बाहेरच्या देशांतून आलेल्या नागरिकांसाठी लागू केलेला आहे. नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटदुखीतून विरोधकांनी या कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत या कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होटबँकेसाठी सुरू केल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी रविवारी कल्याणमध्ये केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाउंडेशनतर्फे झालेल्या ३१ व्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचा सांगता सोहळा पश्चिमेतील टिळक चौक परिसरातील कॅप्टन ओक हायस्कूल सभागृहात पार पडला. यात ‘सीएए-एनआरसी’ समज-गैरसमज या विषयावर भंडारी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते आणि सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे, संमेलनाचे अध्यक्ष सच्चिदानंद शेवडे, स्वागताध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत उपस्थित होते.
भंडारी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा मानवतावादी आहे. घटनेच्या चौकटीत राहूनच कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. देशात धर्माचा आधार घेऊन भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या १४ व्या कलमाविरोधात हा कायदा असल्याची अफवाही पसरवली जात आहे.
नोटाबंदीच्या काळात ज्यांना आपला राग आणि दु:ख व्यक्त करता आले नाही, तेच या कायद्यांच्या बाबतीत खोटेनाटे पसरवत आहेत. दरम्यान, पूर्वी काय बोललो, याच्याशी त्यांनी बांधीलकी ठेवली असती, तर ते आज आमच्याबरोबर असते, असे सांगत भंडारी यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
सावरकरांच्या विरोधामागे जातीचे राजकारण : पोंक्षे
च्स्वा. सावरकरांची लढाई ही मनुष्यजातीच्या स्वातंत्र्यासाठी होती. त्यांनी जात हा शब्द मिटवण्यासाठी आपले आयुष्य वेचले. पण, त्यांना जातीच्या पठडीत बांधून ठेवले गेल्याची खंत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. नाव वेगळे असते, तर विरोध झाला नसता. यामागे जातीच्या मतांचे राजकारण दडले आहे.
च्मी स्पष्ट बोलणारा आहे, जे पटत नाही त्याबाबत मी व्यक्त होतोच, असे सांगत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्रामध्ये कोणी फार काळ टिकू शकत नाही. एकमेकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की, भयंकर मैत्रीची निर्मिती होते, असे मतही त्यांनी सध्याच्या सत्तेच्या समीकरणाबाबत व्यक्त केले.
च्अस्पृश्यता मिटवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य मोठे आहेच, पण सावरकरांनी आपल्या जातीच्या विचारसरणीविरोधात जाऊन अस्पृश्यता मिटवण्यासाठी काम केले, ते मला इतरांपेक्षा काकणभर श्रेष्ठ वाटते, असेही यावेळी पोंक्षे म्हणाले.
‘त्यांची’ गत भुंकणाºया कुत्र्यासारखी! : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जाणीवपूर्वक घाणेरडे गैरसमज पसरवले जात आहेत. ज्याप्रमाणे रस्त्यावरून जाणाºया हत्तीवर कुत्रे भुंकतात, तशी गत सावरकर विरोधकांची झाल्याचा घणाघात संमेलनाचे अध्यक्ष तथा सावरकर अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी यावेळी केला.