अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Published: June 2, 2017 05:21 AM2017-06-02T05:21:36+5:302017-06-02T05:21:36+5:30

प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार लक्ष वेधूनही सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ केडीएमसीतील अग्निशमन दलातील

Agitation of firefighters | अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : प्रलंबित मागण्यांसंदर्भात वारंवार लक्ष वेधूनही सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ केडीएमसीतील अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. त्यांचे हे आंदोलन १५ जूनपर्यंत चालणार आहे. त्याची दखल न घेतल्यास २६ जूनला सामूहिक रजा आंदोलनाचा छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्यांसंदर्भात आतापर्यंत वारंवार महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. संघटनेच्या माध्यमातूनही बैठका झाल्या आहेत. मात्र, मागण्या मान्य झालेल्या नाहीत. परिणामी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अग्निशमन दलाचे काम जिकिरीचे असते. परंतु, या कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप संघटनेचे केडीएमसी युनिट अध्यक्ष व माजी सभागृहनेते कैलास शिंदे यांनी केला आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काळ्या फिती लावून कर्मचारी काम करतील. त्यानंतरही त्याची दखल न घेतल्यास २६ जूनला सामूहिक रजा आंदोलन केले जाईल, असे शिंदे म्हणाले.
अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या जीवावर उदार होऊन सेवा बजावावी लागते. महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांच्याप्रमुख उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सहा महिन्यांपूर्वी झाली होती. यात कर्मचाऱ्यांना धोकाभत्ता, नवीन भरती, जादा कामाचा मोबदला, सुटीच्या दिवशी जादा काम केल्याचा मोबदला आदी मागण्या तसेच समस्यांवर चर्चा झाली होती. मात्र, प्रशासनाने अजूनही त्याची कार्यवाही केलेली नाही, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीदेखील नुकतीच चर्चा करून प्रशासनाच्या नकारात्मक धोरणाचा निषेध म्हणून संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावल्याचे चित्र डोंबिवली एमआयडीसी, कल्याण आधारवाडी, ‘ड’ आणि ‘ह’ प्रभाग कार्यालये, अशा चारही केंद्रांवर पाहायला मिळाले. हे आंदोलन यापुढेही सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

प्रशासनाचे पत्र : अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात योग्य कार्यवाही सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने संघटनेचे युनिट अध्यक्ष शिंदे यांना गुरुवारी पाठवले. मात्र, वारंवार बैठका घेऊनही प्रशासनाला जाग येत नसेल,तर आंदोलन सुरू ठेवण्यावाचून पर्याय नाही, अशी प्रतिक्रि या शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. आताही दखल न घेतल्यास यापुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल, असेही ते म्हणाले.

नागरिकांना वेठीला धरणार नाही

कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन छेडले असले, तरी नागरिकांना वेठीला धरले जाणार नाही. नागरिकांच्या मदतीचे, आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी आलेले कॉल स्वीकारले जातील.
प्रशासनाने आमच्या समस्यांची गंभीरपणे दखल घ्यावी आणि पुढील सामूहिक रजा आंदोलन कसे टळेल, याबाबत खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Agitation of firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.