भिवंडीत महसूल कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन
By नितीन पंडित | Published: November 8, 2023 06:10 PM2023-11-08T18:10:29+5:302023-11-08T18:14:39+5:30
भिवंडी तहसीलदार कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह इतर आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी.
भिवंडी: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी तहसीलदार कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी भिवंडी तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनात भिवंडी तहसीलदार कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह इतर आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माझे कुटुंब माझी जिव्हाळ्याची जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी,पी एफ आर डी ए कायदा रद्द करा , विविध संवर्गातील रिक्त पदे तत्काळ योग्य मार्गाने कायमस्वरूपी भरा, खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करा, त्याचबरोबर ६ सप्टेंबरचा कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करा,भारतीय दंड विधान संहिता कलम ३५३ पूर्वीप्रमाणे प्रभावी करा,नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. शिक्षणाचे छुपे खाजगीकरण रद्द करा, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती विनाअट करा,आठव्या वेतन आयोगाची स्थापना तत्काळ करा या व अशा अनेक मागण्यांसाठी आज तहसीलदार कार्यालयासमोर महसूल व इतर सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले.
शासनाने आमच्या मागणी मागण्याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येतील असा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.