एकीकरण समितीचे पालिका निषेधार्थ प्रभाग कार्यालयात "झोपा काढा" आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 08:53 PM2021-12-23T20:53:31+5:302021-12-23T20:55:02+5:30
प्रभाग समिती हद्दीतील सर्व रस्ते, पदपथ अतिक्रमणा पासून मुक्त करावेत , झपाट्याने वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर सतत कारवाई करून गुन्हे दाखल करावेत.
मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र . ४ च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण होत असताना प्रभाग अधिकारी मात्र सातत्याने तक्रारी करून सुद्धा कारवाई करण्या ऐवजी प्रभाग अधिकारी त्यास संरक्षण देत असल्याने गुरुवारी मराठी एकीकरण समितीने प्रभाग कार्यालयात पालिके निषेधार्थ झोपा काढा आंदोलन केले.
प्रभाग समिती हद्दीतील सर्व रस्ते, पदपथ अतिक्रमणा पासून मुक्त करावेत , झपाट्याने वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर सतत कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. नागरिकांची सनद नुसार कोणत्याही नागरिकांच्या तक्रारीची १५ दिवसात दखल घेऊन कार्यवाही करणे , पालिका आरक्षणाच्या भूखंडातील अतिक्रमण काढून टाकणे आदी मागण्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांच्या कडे समितीचे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या होत्या.तरी देखील प्रभाग अधिकारी व संबंधित अन्य अधिकारी - कर्मचारी कार्यवाही करण्या ऐवजी त्यास संरक्षण देत असल्याने आणि काम न करताच झोपा काढण्याचा पगार घेत असल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे शहर अध्यक्ष सचिन घरत म्हणाले.
गुरुवारी प्रभाग कार्यालयातील झोपा काढा निषेध आंदोलनात समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, कार्याध्यक्ष प्रदिप सामंत सह रविंद्र भोसले, पुरुषोत्तम मोरे, संतोष पाचरणे, निरंजन नवले आदी उपस्थित होते. मीरारोड पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रभाग अधिकारी गायकवाड यांनी कार्यवाही करून लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले .