साकीनाका घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातील संघटना करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:24+5:302021-09-19T04:41:24+5:30
ठाणे : मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर क्रूर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना म्हणजे ...
ठाणे : मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर क्रूर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना म्हणजे अमानुषतेचा कळस आहे. या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातील भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक जनता संघ, बहुजन असंघटित कामगार युनियन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, कामगार एकता कमिटी, महाराष्ट्र घरेलू कामगार युनियन, ट्रेड युनियन सेंटर ऑफ इंडिया, आयटक, ठाणे जिल्हा, समता विचार प्रसारक संस्था, स्वराज अभियान, आरएमपीआय, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, आदी संघटना एकत्र येऊन ठाण्यात लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
महिलांना संविधानात दिलेल्या हक्कांची ही पायमल्ली आहे. सरकारने कायदे मजबूत करावे, राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला आवर घालावा. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे ही जलदगतीने चालवावी, समाजाने स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराला जबाबदार पुरुषवर्चस्ववादी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन निर्मला पवार, लक्ष्मी छाया पाटील, हर्षलता कदम, जगदीश खैरालिया, भास्कर गव्हाळे, प्रा. चंद्रभान आजाद, गिरीश भावे, लीलेश्वर बन्सोड, ॲड. रवींद्र जोशी, सुब्रतो भट्टाचार्य, धोंडिराम खराटे आणि अजय भोसले यांनी केले आहे.