शेतीची कामे संपली, शेकडो नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 05:23 AM2018-11-15T05:23:57+5:302018-11-15T05:24:33+5:30

शेतीची कामे संपली : चरितार्थासाठी वीटभट्टी, शेतावर, हॉटेलमध्ये जाण्यास सुरुवात

Agricultural works are over, hundreds of migratory migrants are migrating | शेतीची कामे संपली, शेकडो नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर

शेतीची कामे संपली, शेकडो नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर

Next

मुरबाड : पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांकडे काही काम नसल्याने तसेच शासनाच्या विविध विभागांची कामे सुरू न झाल्याने रोजगारासाठी शेकडो ग्रामस्थ, आदिवासी तसेच शेतमजूर कुटुंबांसह स्थलांतर करू लागले आहेत. ग्रामीण भागात पावसाळ्यात शेतीची कामे असतात. त्यानंतर, भातकापणी आणि झोडणी अशी कामे असतात. परंतु, दिवाळी झाल्यानंतर काहीच काम नसल्याने ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी हे आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आळेफाटा, जुन्नर, पुणे, ओतूर, बेल्हे, घोडेगाव, नाशिक, मंचर, नगर आदी ठिकाणी कांदा, भाजीपाला लागवड करण्यासाठी तसेच हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी जातात. रोज सकाळी टोकावडे, मोरोशी, सावर्णे, धसई येथून हे आदिवासी, शेतमजूर जीप, ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनांतून धोकादायक परिस्थितीत प्रवास करून जातात.

मजुरांना मागेल ते काम मिळावे, म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये मजुरांनी काम मागायचे असते. त्याप्रमाणे शासनाचे विविध विभाग मनरेगाअंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करते. या प्रक्रियेत काही ना काही वेळ
जातोच.
मात्र, एवढा वेळ ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी थांबू शकत नाहीत. किंबहुना, तेवढे दिवस रोजगार तसेच आर्थिक पाठबळ नसल्याने आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवू शकत नाही. पर्यायाने नाइलाजास्तव पावसाळा संपल्यावर हे मजूर लगेच रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. मनरेगाची कामेही काही ठेकेदार यांत्रिक पद्धतीने करताना दिसतात. त्यामुळेही मजुरांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण शेतमजूर कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत.
शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी, बांधकाम, पाटबंधारे आणि वनविभागाने पावसाळा जाऊन एक महिना लोटला, तरी कामे सुरू झाली नसल्याने हे ग्रामस्थ, शेतमजूर, आदिवासी कुटुंबाच्या चरितार्थासाठी कामाच्या शोधात वीटभट्टी, शेतावर तसेच हॉटेलमध्ये कामासाठी स्थलांतरित होत आहेत. या स्थलांतरामुळे लोकांची रोजगाराची सोय होणार आहे.

मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर
रोजगारासाठी शेकडो आदिवासी, शेतमजूर, ग्रामस्थ स्थलांतरित होत असल्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होताना दिसतो. शेतावर किंवा वीटभट्टीवर काम करणाºया मजुरांना मुले शाळेत कुठे टाकायची व त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, हा प्रश्न या मजुरांना पडतो.

आदिवासी, शेतमजुरांचे आरोग्य धोक्यात
स्थलांतरित झालेले आदिवासी, शेतमजूर हे कामाच्या ठिकाणीच राहत असल्याने त्यांच्यासोबतच्या लहान मुलांच्या आरोग्याबाबतच्या समस्या तशाच राहतात. त्यांना आरोग्यसुविधा वेळेवर मिळत नसल्याने विविध प्रकारचे आजार जडत आहेत.

मजुरांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्याकडे कामाची मागणी केल्यास आम्ही त्वरित काम देऊ.
- दोडके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड
 

Web Title: Agricultural works are over, hundreds of migratory migrants are migrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.