प्रचंड भराव अन् बेकायदा बांधकामामुळे पाली गावातील शेती पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 12:00 AM2022-07-08T00:00:34+5:302022-07-08T00:01:09+5:30
निवेदनात मंडळाने म्हटले आहे कि, पाली गावचे पाणी जाण्याचा एकमेव मार्ग नवीखाडी असून तो प्रचंड भराव करून बंद केलेला आहे
मीरारोड - भाईंदर पाली गावातील ग्रामस्थांची शेती पाण्याखाली गेली आहे. पालिकेच्या धावगी डोंगरावरून येणाऱ्या डम्पिंगच्या घाण पाण्याचा लोंढा. त्यासोबतच, नैसर्गिक नाले व खाड्यामध्ये भराव करून बेकायदा बांधकामे आणि मोकळ्या जमिनीत झालेली वारेमाप भरणी यामुळे हा परिसर पाण्याखाली गेला आहे. पालीगाव उत्कर्ष मंडळाने महापालिका आयुक्तांसह अपर तहसीलदार, तलाठी व स्थानिक ३ नगरसेवकांना गेल्यावर्षीपासून लेखी निवेदने दिली आहेत.
निवेदनात मंडळाने म्हटले आहे कि, पाली गावचे पाणी जाण्याचा एकमेव मार्ग नवीखाडी असून तो प्रचंड भराव करून बंद केलेला आहे. उत्तर भागातील इतर नाले देखील बंद केले आहेत. त्यामुळे धावगी डोंगरावरील कचरा डम्पिंगमधून येणारे घाणीचे पाणी शेतात व पाली गावात शिरून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. शेतात जूनमध्ये पेरणी केलेले भात पीक पाण्याखाली गेले आहे. तर, डंपिंग ग्राउंड येथील काँक्रिट भिंत तोडून घाण पाणी शेतात सोडण्यात आले आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात भराव होत असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. डम्पिंगच्या घाण पाण्या मुळे पावसाळ्यात मिळणारे चिवनी मासे सुद्धा दुर्मिळ झाले आहेत. स्थानिक नरसेविका शर्मिला बगाजी यांनी पालिकेच्या माध्यमातून जेसीबी उपलब्ध करून घेतसुद्धा जेसेपी घेऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, ते उपयोगी ठरले नाहीत. पाली ग्रामस्थांसह उत्तर भागातील स्थानिकांनी देखील वारेमाप बेकायदा भराव व अनधिकृत बांधकामांनी खाडीपात्र व नैसर्गिक नाले बंद होत असल्याच्या तसेच मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात भराव केले गेल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून करून देखील महापालिका, महसूल व राजकारणी- नगरसेवक यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक चालविल्याने दरवर्षी परिस्थिती आणखी गंभीर बनत चालल्याने संताप व्यक्त केला जात आहे.