उल्हासनगरात ऐन गणेशोत्सवापूर्वी कचऱ्याचे साम्राज्य, ठेकेदारावर कारवाईची मागणी
By सदानंद नाईक | Published: September 16, 2023 04:13 PM2023-09-16T16:13:19+5:302023-09-16T16:14:22+5:30
ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिका दरमहा कचरा उचलण्यावर अड्डीच कोटी पेक्षा जास्त खर्च करूनही ऐन गणेशोत्सवापूर्वी शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. अश्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर महापालिकेने कचरा उचलण्याचा ठेका दामदुप्पट किंमतीला कोणार्क नावाच्या कंपनीला देऊनही शहरात कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. शहरातील कचरा उचलण्यावर महापालिका दरमहा अड्डीच कोटी पेक्षा जास्त खर्च करते. तसेच प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करून, ठेकेदाराला दरमहा ८० लाखाचे बिल महापालिका अदा करीत आहेत. प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाई प्रायोगिक तत्वावर दिल्याचे बोलले जात होते. मात्र प्रभागतील साफसफाई इतर प्रभाग समितीच्या तुलनेत जेमतेम असून याबाबत असंख्य तक्रारी येऊनही कारवाई करीत नसल्याची टीका महापालिका प्रशासनावर होत आहे.
महापालिकेचा नव्हेतर ठेकेदाराचा दबाव महापालिकेवर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयाकडे जो रस्ता जातो. त्या रस्त्यावरील कचरा कुंडी हटविली आहे. त्याठिकाणीं कचरा टाकू नका, दंडात्मक कारवाई केली जाईल. असे नामफलक महापालिकेने लावण्यात आले. मात्र नागरिक त्याच नामफलकाच्या खाली बिनधास्त कचरा टाकून, एकप्रकारे नागरिक महापालिकेला आवाहन देत आहेत. छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाच्या पूर्व बाजूला कचऱ्याचे ढीग लागले असून शहरात हीच परिस्थिती आहे. मुख्य स्वछता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी याबाबत संपर्क केला असता झाला नाही. महापालिका सफाई कामगारांच्या जागी दुसरेच नागरिक सफाई करीत असल्याचे चित्र शहरात आहेत. याबाबत असंख्य तक्रारी जाऊनही आरोग्य विभागाने कारवाई केली नाही. शिवसेना शिंदे गटाच्या एका स्थानिक नेत्यांची पत्नी सफाई कामगार होती. मात्र तिने कधी झाडू न मारता पगार घेतल्याची टीका झाली. अखेर जागरूक नागरिकांनी तक्रार केल्यावर, चौकशी अंती तीच्यावर महापालिकेने बडतर्फ कारवाई केली. असे सर्रास प्रकार सुरू असूनही कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.