शवागारातील एक वातानुकूलित यंत्र बंद, मृतदेहांची दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 04:26 AM2018-08-26T04:26:06+5:302018-08-26T04:26:23+5:30
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात मृतदेहांची संख्या गेल्या काही दिवसांत क्षमतेपेक्षा चारपट झाली होती. त्याचा कळतनकळत परिणाम त्या शवागारातील वातानुकूलित यंत्रणेवर झाल्याने
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात मृतदेहांची संख्या गेल्या काही दिवसांत क्षमतेपेक्षा चारपट झाली होती. त्याचा कळतनकळत परिणाम त्या शवागारातील वातानुकूलित यंत्रणेवर झाल्याने दोनपैकी एक यंत्रणा बंद पडली आहे. जोपर्यंत शवागारात काम करण्यास जागा मिळत नाही, तोपर्यंत त्याची दुरुस्ती करता येत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने पोलीस यंत्रणांना पत्रव्यवहार करून मृतदेह घेण्याबाबत कळवले आहे. त्याचबरोबर, शवागारात कूलिंग राहावे, यासाठी प्रशासनावर बर्फ आणण्याची वेळ ओढवली आहे. तसेच नवीन मृतदेह घेऊ नयेत, असे सूचनावजा आदेश रुग्णालय प्रशासनाने संबंधित विभागाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
या रुग्णालयातील शवागारात १२ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्यामध्ये दोन वातानुकूलित यंत्रणा बसवल्या आहेत. त्यातच दिवसाला पाच ते सहा मृतदेह दररोज आणले जातात.त्यामुळे येथे व्यवस्थितपणे कूलिंग होत नसल्यामुळे मृतदेहांची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तेथे दिवसाला बर्फाच्या तीन ते चार लाद्या मागवून तेथे कूलिंग ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेह जास्त असल्याने तेथील बंद वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती करता येत नाही. यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच ठाणे आणि पालघर ग्रामीण अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पोलीस यंत्रणांना मृतदेह घेऊन जाण्याबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. दावा न केलेल्या एका मृतदेहावर वर्षभरानंतर अंत्यसंस्कार केल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
वातानुकूलित यंत्रणा फार पूर्वीच बंद पडलेली आहे. मृतदेहांची संख्या जास्त असल्याने तेथे काम करता येत नाही. सोमवारी ही यंत्रणा सुरू करण्याचे काम हाती घेतले जाईल असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
२५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
येथील मृतदेहांची संख्या ४० ते ४५ च्या घरात पोहोचल्याने येथील वातानुकूलिन यंत्रणेवर परिणामा झाला. व ती पूर्णपणे बंद पडली आहे.
गेल्या काही दिवसांत एकूण २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र अनेक मृतदेह दीर्घकाळ पडून होते.